Breaking News

बंदिवानांनी ठेवला सर्वांसमोर आदर्श

बक्षिसाची रक्कम दिली पुलवामातील शहिदांच्या कुटुंबीयांना

तळोजा : प्रतिनिधी : राष्ट्रभक्तीपर निबंध स्पर्धेत विजेते ठरल्यानंतर तळोजा मध्यवर्ती कारागृह येथील बंदिवानांनी आपल्या पारितोषिकांची रक्कम पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांसाठी दिली. यामुळे त्यांनी एक आदर्श इतर बंदिवानांसमोर निर्माण केला आहे. त्यांच्या पारितोषिकाची रक्कम रायगड जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून त्यांच्यामार्फत पुढे ती या कुटुंबीयांपर्यंत पाठविण्याची व्यवस्था केली जाईल, असे तळोजा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक कौस्तुभ कुलेकर यांनी सांगितले.

रामचंद्र प्रतिष्ठान, मुंबई ही संस्था गेली दोन वर्षे महाराष्ट्रातील विविध कारागृहांमध्ये राष्ट्रभक्तीपर निबंध स्पर्धेचे आयोजन करत असून यंदा ही स्पर्धा सर्व मध्यवर्ती, विशेष व निवडक जिल्हा अशा 16 कारागृहांमध्ये आयोजित करण्यात आली. त्याला दोन हजारांहून अधिक महिला व पुरुष स्पर्धकांचा सहभाग मिळाला. तळोजा येथील मध्यवर्ती कारागृहात पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. त्या वेळी बंदिवानांनी उत्स्फूर्तपणे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांसाठी ही मदत जाहीर केली. त्यातून त्यांच्यातील सुधारणा व पुनर्वसनाचा प्रत्यय येत आहे. या कार्यक्रमासाठी कारागृहाचे अधीक्षक कौस्तुभ कुलेकर, शिक्षक नामदेव शिंदे, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या ज्येष्ठ सदस्या, लेखिका अनुराधा खोत, ज्येष्ठ कामगार नेते व सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब देसाई, महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचे सदस्य देवेंद्र गंद्रे, तसेच रामचंद्र प्रतिष्ठानचे अशोक शिंदे उपस्थित होते. या उपक्रमाला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सहाय्य मिळाले आहे.

तळोजा मध्यवर्ती कारागृहातील अनेक बंदिवान स्पर्धकांनी राष्ट्रभक्तीपर निबंध स्पर्धेत भाग घेऊन आपले विचार मराठी, हिंदी व इंग्रजी निबंधांतून व्यक्त केले. त्यांचे परीक्षण डॉ. सुमेधा मराठे यांनी केले असून त्यांच्या मते या निबंधातून व्यक्त झालेले विचार हे अत्यंत प्रभावी असून ते कारागृहातील बाहेर आल्यानंतर निश्चितपणे समाजासाठी, तसेच देशासाठी ठोस काम करू शकतील, असा विश्वास वाटतो. राष्ट्रभक्तीपर निबंध स्पर्धेचा उपक्रम यापुढील काळातदेखील नियमितपणे महाराष्ट्रातील कारागृहांमध्ये राबविण्यात येईल, असा निर्धार संस्थेच्या वतीने संचालिका नयना शिंदे ह्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply