Breaking News

राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन

दोन हजारहून अधिक पदे भरणार -मुख्यमंत्री

मुंबई : प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (दि. 3) स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात आल्याची घोषणा केली. स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयात 2063 पदे भरली जाणार आहेत, शिवाय यासाठी 1143 कोटी रुपये राज्य सरकारने दिले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज जागतिक दिव्यांग दिन आहे. स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय असले पाहिजे अशी आपली सगळ्यांची भावना होती. हे राज्य सर्वसामान्यांच्या हितासाठी सुरू झाले आहे. या राज्यात लोकांच्या हिताचेच निर्णय होणार आहेत. आज दिव्यांगांसाठी सोन्याचा दिवस आहे. आपले सरकार आल्यानंतर तुम्हाला दिव्यांग मागण्यांसाठी आंदोलन करावे लागले नाही. राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची आज मी घोषणा करीत आहे.
या स्वतंत्र मंत्रालयासाठी 2063 पदे यासाठी निर्माण होतील तसेच सेक्रेटरी दर्जाचा अधिकारी याकरिता असेल. तुमच्या कल्याणासाठी जे जे आवश्यक आहे, ते सगळे हे मंत्रालय करेल. कुठलेही धोरण ठरवताना आता दिव्यांगांचे मतसुद्धा जाणून घेतले जाईल. हा निर्णय फक्त 24 दिवसांत झाला असून दिव्यांग मंत्रालय आपण स्थापन केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनासुद्धा दिव्यांगांबद्दल तळमळ होती. केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वस्त केले आहे की, या मंत्रालयासाठी कुठेही पैसेही कमी पडणार नाहीत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सामाजिक न्याय विभागातर्फे आयोजित या कार्यक्रमाला मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार बच्चू कडू, आमदार यामिनी जाधव, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे आदी उपस्थित होते.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply