Breaking News

लालपरी रस्ते पे खुब चली, खुब चली

’देखा ना है रे, सोचा ना है रे, रख दी निशाने पे जान,’ असे ‘बॉम्बे तू गोवा’ चित्रपटात गाडीत अमिताभ बच्चन अरुणा इराणीला म्हणताना पाहून अनेक तरुणांना लालपरीतून प्रवास करताना एखाद्या सुंदर तरुणीला पाहून त्यावेळी हे गाणे गुणगुणावेसे नक्कीच वाटले असेल. त्याच्या आठवणी आजही त्यांच्या मनात असतील. या लालपरीमुळे एखाद्याला आपल्या स्वप्नातील परी मिळाली असेल किंवा तिला आपल्या स्वप्नातील राजकुमार सापडला असेल. कोणी आयुष्याचा जोडीदार मिळवला असेल, तर कोणाला चांगल्या नोकरीची संधी मिळाली असेल. प्रत्येकाच्या मनाच्या कोपर्‍यात त्या आठवणी आजही नक्कीच असतील. आज हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे आपल्या सगळ्यांची लाडकी लालपरी 71 वर्षांची झाली. खरं वाटत नाही ना. सार्वजनिक प्रवासी वाहतुकीची सुरुवात महाराष्ट्रात 1932च्या सुमारास खासगी व्यावसायिकांद्वारे झाली. त्यापुढच्या आठ-दहा वर्षांत या वाहतुकीचे नियमन करण्याची गरज भासू लागली. 1947मध्ये भारतातील ब्रिटिशांची राजवट संपुष्टात आली. स्वतंत्र भारताच्या मुंबई प्रांतात 1948मध्ये बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉपोर्रेशन (बीएसआरटीसी) या नावाने प्रवासी वाहतूक करण्यासाठी सरकारी कंपनी स्थापन करण्यात येऊन प्रवाशांच्या सार्वजनिक वाहतुकीचा (पब्लिक ट्रान्सपोर्ट) एकाधिकार या कंपनीला बहाल करण्यात आला.

बीएसआरटीसीची पहिली बस 1 जून, इ. स. 1948 या दिवशी अहमदनगर ते  पुणे  या मार्गावर धावली. सदरची बस पुणे येथील पहिले चालक तुकाराम पांडुरंग पठारे व वाहक लक्ष्मण केवटे यांनी चालवली. भाषिक आधारावर राज्य पुनर्रचनेनंतर मुंबई, मध्य प्रांत आणि संपुष्टात आलेल्या निझाम राज्याचा भाग मिळून महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. त्या भागातील वाहतूक सेवा करीत असलेल्या संस्थाही बीएसआरटीसीमध्ये विलीन करून नव्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) या नावाने महामंडळाचा कारभार सुरू राहिला.

पहिल्या एसटी बसची बॉडी आजच्यासारखी लोखंडी नव्हती. ती लाकडी होती. वरील छप्पर कापडी होते. सकाळी आठ वाजता 30 आसनक्षमता असलेली बेडफोर्ड कंपनीची पहिली बस अहमदनगरहून पुण्याकडे रवाना झाली. अहमदनगर ते पुणे या प्रवासाचे तिकीट फक्त अडीच रुपये होते. प्रवास दीड-एकशे किलोमीटरचाच. ज्या गावांमधून एसटी जायची, त्या गावांमध्ये लोक मोठी गर्दी करीत होते. त्यावेळी वाहने तशी कमी पाहायला मिळत असल्याने या गाडीचे लोकांना अप्रूप वाटायचे. गावागावांमध्ये लोक बसचे जल्लोषात स्वागत करीत असत. गावागावात सुवासिनी ताट घेऊन उभ्या राहायच्या आणि पूजा करायच्या. नगर-पुणे प्रवासात रस्त्याच्या दुतर्फा एसटी बसला पाहण्याची स्पर्धा आणि नव्या गाडीला ओवाळण्याची लोकांच्यात उत्सुकता होती.

महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य लोकांना खेड्यापासून ते शहरापर्यंत जोडणारी एसटीची सेवा ही एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा आहे. अनेक पाडे आणि खेड्यांपासून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थीवर्गासाठी हक्काचे वाहन म्हणजे आपली एसटी होय. आजारी व्यक्तींना खेड्यापासून तालुका आणि जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी हक्काचे आणि सुरक्षित प्रवासाचे वाहन म्हणजे आपली एसटी होय. एसटीची सेवा गाव तेथे एसटी, रस्ता तेथे एसटी, या ब्रीदवाक्यानुरूप खेड्यापासून शहरापर्यंत विस्तारली आहे.

आजच्या आधुनिक युगात ज्याप्रमाणे तरुणी आपल्या वेशभूषा बदलतात, त्याप्रमाणे या लालपरीनेही आपल्या वेशभूषेत अनेक बदल केलेले आपल्याला पाहायला मिळाले. लाल पिवळा रंग, मग लाल भगवा रंग, हिरव्या-पांढर्‍या निमआराम आणि जांभळ्या-पांढर्‍या हिरकणी बसगाड्यांसोबतच शिवनेरी, अश्वमेध आणि शीतल या तीन प्रकारच्या वातानुकूलित आरामसेवा सुरू केल्या. वाहक म्हणून सुंदर ललनाही दाखल झाल्या आणि आता सामान्यांसाठी वातानुकूलित  शिवशाही, पण सर्वसामान्य माणसाच्या मनात मात्र लालपरी अनेक वर्षे राज्य करीत आहे. अनेक तरुण-तरुणींनी या लालपरीतून आंख-मिचोली केली असेल. कोणाला आपला आयुष्याचा जोडीदार सापडला असेल. आजही अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी लालपरीच्या साक्षीने भावी आयुष्याची स्वप्ने रंगवताना दिसतात. 

खेड्यात डॉक्टर नसल्याने या लालपरीमधून शहरात वेळेवर जाऊन उपचार झाल्याने अनेकांचे प्राण वाचले असतील. शहरात शिक्षणासाठी राहणार्‍या विद्यार्थ्यांना घरचा डबा मिळाला असेल. वृध्द, अपंग आणि विद्यार्थ्यांना तिकिटात सवलत असल्याने गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होऊ शकले. नोकरीच्या मुलाखतीला वेळेवर पोहचल्याने कोणाला नोकरी मिळाली. त्यामुळे आज तो मोठ्या बंगल्यात राहून आलिशान कारमधून फिरत आहे. काहींना आपल्या नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी सोय झाल्याने आपल्या कुटुंबाबरोबर राहता आले. अनेकांना रात्रीच्या प्रवासात तिने सोबत केली आहे. काहींना लालपरीने पावसाळ्यात ’एक छत्री हम है दो’ असे गुणगुणण्याची संधीही मिळवून दिली असेल. अशा अनेक गोड आठवणींची साक्षीदार असलेली लालपरी रस्ते पे खुब चली, खुब चली, असेच म्हणावे लागेल.

– नितीन देशमुख

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply