मुंबई : प्रतिनिधी
गेल्या 24 तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली असली, तरी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा उष्णतेच्या लाटेने होरपळून निघत आहे. मराठवाडा, कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
कोकण प्रांतही तापला असून येथे अनेक दिवसांपासून उष्णता जाणवत आहे. अद्याप केरळात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या नसल्याने राज्यातही जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनपूर्व सरी दाखल होण्याची आशा धूसर झाली आहे.
पुढील काही दिवसांत हवामानात सकारात्मक बदल नोंदविण्यात येतील. हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, मुंबई, नाशिक, पुणे, नांदेड आणि औरंगाबाद येथे येत्या दोन दिवसांत हलक्या पावसाची शक्यता आहे. परिणामी येथील कमाल तापमानात घट नोंदविण्यात येईल. मात्र विदर्भातील हवामान कोरडेच राहील. अकोला, अमरावती, नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांची उष्णतेच्या लाटेपासून सुटका होणार नाही.
पुढील 24 तासांत सिक्किम, पश्चिम बंगालमध्ये मध्यम आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. उ. प्रदेश, बिहार, झारखंड, ओरिसा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मराठवाडा, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये वेगाने वारे वाहतील. शिवाय मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.राजस्थान आणि पंजाबमध्ये वादळी वारे आणि मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील पर्वतरांगांमध्ये पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरयाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये उष्णतेच्या लाटेचा प्रभाव राहील.
दिल्लीत मान्सून जुलैमध्ये
25 ते 30 जूनदरम्यान मान्सून दिल्लीत दाखल होतो. मात्र सध्याच्या परिस्थितीनुसार मान्सून दिल्लीत जूनऐवजी जुलै महिन्यात दाखल होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तत्पूर्वी मान्सूनपूर्व पाऊस दिल्लीकरांना दिलासा देईल, अशी आशा असली तरी दूरदूरवर मान्सूनपूर्व पावसाचीही चिन्हे नाहीत.