Breaking News

पोलादपुरात वणवाविरोधी जनजागृती अभियानाची गरज

पोलादपूर तालुक्यात रात्रीची थंडीची लाट आणि दिवसा उजेडात वाढलेल्या उष्म्यासोबतच वणव्यांचेही प्रमाण वाढल्याने दिवसा तापमानवाढ होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या पौष सुरू असतानाच वृक्षवल्लींना नवी चैत्रपालवी फुटण्यापूर्वी शेतात पारंपरिक पद्धतीने राब जाळण्यासाठी झाडांची पाने व फांद्याही तोडून शेतात सुकत ठेवण्यात आल्याचे दृश्य सर्वत्र दिसत आहे. अनेक ग्रामीण रस्त्यालगत पावसाळ्यामध्ये उगवलेले गवत आता पुरुषभर उंचीएवढे वाढल्याने ते अचानक काही मानवी व नैसर्गिक कारणांनी पेट घेत आहे. परिणामी सरपटणारे आणि उडणारे जीव बिळे आणि घरटी गमावल्याने सैरावैरा संचार करीत आहेत.

शेतीच्या मशागतीसाठी झाडांच्या नव्या फांद्या आणि पानांची कवळे काढून त्याचे शेतजमिनीवर राब पेटवून शेतीची मशागत करण्याची ही पारंपरिक पद्धत तालुक्यात सर्वत्र रूढ झाली आहे. यामुळे थेट सूर्यप्रकाशामुळे शेतजमिनीच्या मातीमध्ये नवीन पिकाच्या वाढीसाठी निर्माण होणारे सिलीकॉनीयस गुणधर्म असलेले पोषक द्रव्य संपूर्ण जळून जात असल्याचे आधुनिक कृषी तंत्रज्ञान सांगते. पोलादपूर तालुक्यात कवळं काढून राब पेटविण्याचा हंगाम आता सुरू झाला आहे. अनेक शेतामध्ये शेण, फांद्या, पानं असा राब अंथरला गेला आहे. यात सागवानी झाडांच्या पानांचा आणि कोवळ्या फांद्यांचा राबामध्ये जास्त उपयोग झाल्याचे दिसून येत आहे. यालाच कवळं काढणे असे म्हणतात. यामुळे सागाची झाडं बोडकी झाल्याचेही दृश्य सर्वत्र दिसून येत आहे. दुसरीकडे काही वर्षांपूर्वी कवळं तोडताना चार-पाच शेतकर्‍यांना हकनाक विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने जीव गमवावा लागल्याचे दुर्दैवी सत्य तालुक्याला अनुभवावे लागले आहे.

एकीकडे सागाची पाने जमिनीमध्ये विघटित होऊन त्यांचे मातीत रूपांतर होण्यास जास्त अवधी लागत असल्याचे कृषी विज्ञान सांगते. त्यामुळे सागमाफियांना हा हंगाम शेतीच्या मशागतीच्या निमित्ताने सागाची अवैध वृक्षतोड करण्यास प्रोत्साहित करणाराही ठरत आहे. कोंढवी येथील एका शेतकर्‍याने पेटविलेल्या राबामुळे वणवा भडकून लोकवस्तीमध्ये असलेल्या एका गुरांच्या वाड्यात आला आणि दुसर्‍या शेतकर्‍याचे वासरू होरपळल्याची दुर्घटना झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तालुक्यात संध्याकाळी उंच डोंगरावर विद्युत रोषणाई केल्यासारखे वणव्यांचे दृश्य मनोहारी दिसत असले तरी हे वणवे भरदुपारी जेव्हा पेटतात तेव्हा पाणीटंचाई असलेल्या या तालुक्यात शेतकर्‍यांना त्यावर नियंत्रण ठेवणेदेखील अशक्यप्राय होत आहे. पोलादपूर तालुक्यातील माळरानावरील गवताचे प्रमाण पाहता ते तालुक्याला पशुधन संगोपनासाठी दुधदुभता तालुका अशी ओळख देण्यास उपयुक्त आहे, मात्र तरीही ’नेमेचि येतो मग पावसाळा…’प्रमाणे ’दरवर्षी लागतात येथे वणवे…’असा दाहक अनुभव शेतकरी घेताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात वणवे लागणे व लावण्याचे प्रकार हे शेतातील पारंपरिक राब पेटविण्याप्रमाणे सर्रास घडत आहेत. परिणामी बिळांमध्ये अचानक धूर व उष्णतेच्या झळा पोहचल्याने साप, सरडे, ससे, रानकोंबडे तसेच विविध प्रकारचे पक्षी सैरवैर झाल्याचे दृश्य पाहण्यास मिळत आहे. तालुक्यातील ग्रामीण रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या उंच माजलेल्या गवताने अचानक पेट घेतल्यानंतर गवतामध्ये भारद्वाज पक्ष्यांनी मोठ्या संख्येने केलेल्या घरट्यांना भडाग्नी मिळाला. त्यामुळे हे सर्व भारद्वाज पक्षी एका निष्पर्ण वृक्षाभोवती घिरट्या घालून आसरा गमाविल्याचे दु:ख करताना दिसत होते. पोलादपूरमध्ये वन्यजीवांमध्ये भेकर, रानडुक्कर, मांडूळ, सर्प, खवले मांजर, ससे, साळींदर असे प्राणी, कवडे, भारद्वाज रानकोंबडे तसेच अन्य पक्षी नेहमीच या वणव्यांमध्ये मृत्युमुखी पडल्याचे चित्र पाहावयास मिळाले आहे.

काही दिवसांपूर्वी रानवडी येथील रस्त्यालगतच्या गवताने पेट घेतल्यानंतर बोरावळे सरपंच वैभव चांदे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने हा वणवा विझवण्यासाठी अथक परिश्रम केल्यानंतर तालुक्यात सर्वत्र कौतुक झाले.

पोलादपूर तालुक्यातील कृषी विभाग याबाबत शेतकरीवर्गात प्रबोधन करण्याच्या मानसिकतेत नाही. वास्तविकत: पावसाळी पीक घेऊन झाले की जमीन ओलसर असतानाच शेताची नांगरणी केल्यानंतर सूर्यप्रकाश आणि सूर्यकिरणे थेट जमिनीत मातीमध्ये शिरून माती भुसभुशीत होण्यास मदत होतेच, पण यासोबतच नंतरच्या पिकासाठी पोषक अशा सिलीकॉनीयस द्रव्याची निर्मिती होऊन पिके जोमाने वाढतात हा कृषी विज्ञानाचा शोध तालुक्यातील तापमानवाढीसोबतच धुरामुळे होणार्‍या प्रदूषणावरही नियंत्रण मिळवण्यास साह्यभूत ठरणार आहे. याखेरीज जगाला भेडसावणारी जागतिक तापमानवाढीची म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंगची समस्यादेखील पोलादपूरचे तापमान वाढवण्यास कारणीभूत ठरत आहे. वातावरणाचे संतुलन बिघडवण्यास हे राब जाळण्याची मशागतीची पारंपरिक पद्धत मदत करीत आहे.

तालुका कृषी कार्यालय आणि पंचायत समितीच्या कृषी विभागासह विविध समाजाच्या पुढार्‍यांनीही तालुक्यातील राब जाळण्याच्या पारंपरिक जुन्या मशागतीबाबत ग्रामीण जनतेचे प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. याखेरीज गवत कोवळे असतानाच माळावरून काढून पशुधन संवर्धनासाठी वापर झाला, तर दरवर्षी वणवे लागण्याच्या प्रमाणात घट होऊन हवेमधील अचानक वाढणारा उष्मा कमी होऊ शकणार आहे. पाणलोट समित्यांच्या प्रयत्नाने नजीकच्या काळात पाणी अडवले तरी ते जिरल्यानंतर जमिनीतील पाण्याची वाफ मोठ्या प्रमाणात होऊन सिंचनाचे प्रयत्नच अयशस्वी ठरण्याची शक्यता असल्याने राबाचे तरवे आणि अकाली वणवे लागण्याचे प्रकार थांबवले गेले पाहिजेत, अशी अपेक्षा तालुक्यात कार्यरत कृषीविषयक स्वयंसेवी संस्थांकडून व्यक्त होत आहे.

-शैलेश पालकर, खबरबात

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply