Breaking News

पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना मिळणार 11 लाख 35 हजार पाठ्यपुस्तके मोफत

अलिबाग : प्रतिनिधी

समग्र शिक्षा अंतर्गत इयत्ता पहिली ते  इयत्ता आठवीमध्ये शिकणार्‍या रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना 11 लाख 35 हजार 119 मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ मिळणार असून 17 जून या शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी  विद्यार्थ्यांना पुस्तके मिळतील, अशी माहिती जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शैलजा दराडे यांनी दिली आहे.

कोणत्याही बालकाचे शिक्षण हे पुस्तकाअभावी वंचित राहू नये, तसेच सर्व दाखलपात्र मुलांची शाळांमध्ये 100 टक्के उपस्थिती टिकवून गळतीचे प्रमाण शून्यावर आणणे यासाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तक योजना सुरु करण्यात आली आहे. इयत्ता पहिले ते आठवीच्या शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्यात येतात. रायगड जिल्ह्यात  11 लाख 35 हजार 119 पाठ्य पुस्तके शासनातर्फे मोफत पुरविण्यात येणार आहेत.  रायगड जिल्ह्यातील 3271 शाळांना या योजनेचा लाभ होणार असून मराठी, उर्दू,  हिंदी, गुजराती व इंग्रजी अशा माध्यमांतील शाळांचा यात समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण 2 लाख 30 हजार 741 विद्यार्थ्यांना ही पुस्तके मोफत वाटप होतील.

या पुस्तकांच्या वाहतुकीसाठी विभागीय पाठ्यपुस्तक भांडार पनवेल ते तालुकास्तरापर्यंत प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे  यांनी वाहतूकदार निश्चित केलेला आहे. त्यामार्फत ही वाहतूक होईल. तसेच तालुकास्तर ते शाळास्तरापर्यंतची वाहतूक  ही संबंधित तालुकास्तरावरुन होणार आहे. शाळा सुरु होण्याच्या सात दिवस आधी ही पाठ्यपुस्तके मुख्याध्यापकांच्या ताब्यात असतील. संपर्क पदाधिकारी, अधिकारी, पालक यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना समारंभपूर्वक 17 जून या दिवशी पुस्तके मोफत देण्यात येतील, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती दराडे यांनी कळविले आहे.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply