उरण : प्रतिनिधी : उरण तालुक्यातील ठिकठिकाणच्या नागरी वस्त्यांमध्ये मागील कालखंडात कधीतरी आढळून येणारे विविध प्रकारचे विषारी आणि बिनविषारी साप मोठमोठे अजगर अधिक प्रमाणात दिसू लागले आहेत. भक्ष्याच्या शोधात आलेले साप, अजगर नागरी वस्तीत आढळू लागले आहेत. तालुकातील वने आणि मोठमोठे डोंगर, दर्या नष्ट होत चालल्याने आणि वन्यजीवांच्या आश्रयस्थानावर मानवाने अतिक्रमण केल्याचा दुष्परिणाम असल्याचे मत सर्पमित्रांकडून व्यक्त केले जात आहे.
उरण तालुक्यात झपाट्याने औद्योगिकीकरण होत चालले आहे. वाढते औद्योगिकीकरण आणि विकासाच्या नावाखाली नैसर्गिक डोंगर, दर्या पठारांवर बुलडोझर फिरून ते भुईसपाट करण्यात येत आहेत. त्यामुळे नैसर्गिक वनसंपदा नष्ट झाल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे. बेसुमार वृक्षतोडीमुळे नैसर्गिक हिरवळी सिमेंट काँक्रीटच्या वाढत्या जंगलात हरवून गेली आहे. खोदाई भरावांच्या कामामुळे वन्यजीव, तसेच जमिनीवर सरपटणार्या सापांची अंडी, पिल्ले दगड मातीच्या भरावाबरोबरच वाहून जाऊ लागली आहेत. परिणामी वन्यजीवांची आश्रयस्थाने जमीनदोस्त झाल्याने आणि वन्यजमिनींवर मानवाच्या वाढत्या अतिक्रमणामुळे जंगलातील हजारो वन्यजीवांनी आपला मोर्चा नागरी वस्त्यांकडे वळविला आहे.
त्यामुळे उरण तालुक्यातील परिसरात नागरी वस्त्यांमध्ये कधी तरी नजरेस पडणारे मोर लांडोर, गरूड, कोकिळा यांच्यासारख्या दुर्मिळ पक्ष्यांबरोबरच सरपटणारे प्राणीही मोठ्या प्रमाणात दृष्टीस पडू लागले आहेत. नेहमीच जंगलात आढळून येणारे भलेमोठे अजगरही मानवी वस्त्यांमध्ये भक्ष्यांच्या शोधार्थ येऊ लागले आहेत. उरण परिसरात 5 फूटपासून ते 14 फूट लांबीचे भलेमोठे अजगर आढळून आल्याची माहिती सर्पमित्रांकडून मिळत आहे. उरण तालुक्यातील ग्रामीण भागातील वस्तीत इंडियन रॉक पायथॉन जातीतील नर-मादी अजगर, मण्यार, घोणस, तसेच बिनविषारी सापांबरोबर अन्य वन्य जीवांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली.
नागरी वस्त्यांबरोबर नियमित दगदग असलेल्या जेएनपीटी बंदरातील विविध कंटेनर गोदामातही विषारी बिनविषारी जातींच्या सापांसह अजगर आढळून येऊ लागले आहेत. वन्यजीवांच्या आश्रयस्थानावरच मानवाने केलेल्या अतिक्रमणामुळेच दुर्मिळ वन्यजीव नागरी वस्त्यांकडे फिरकू लागले आहेत. नागरी वस्त्यांमध्ये विषारी-बिनविषारी सापांच्या जातीचा वावर वाढल्याने मात्र नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरी वस्त्यांमध्ये सरपटणार्या विविध वन्य जीवांचा वावर वाढला असून, वने, डोंगर, दर्या व हिरवळ नष्ट होत चालल्याने आणि वन्यजीवांच्या नैसर्गिक आश्रयस्थानांवर मानवाने अतिक्रमण केल्याचा हा दुष्परिणाम असल्याचे वन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.