पनवेल ः प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन व इनरव्हील क्लब ऑफ इंडस्ट्रीयल यांच्या वतीने सामाजिक संदेश व जनजागृतीच्या उद्देशाने महिला मोटरसायकल रॅली व पथनाट्याचे आयोजन रविवारी (दि. 1) करण्यात आले होते. पनवेल शहरासह नवीन पनवेल येथ आयोजित या रॅलीचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या वर्षाताई ठाकूर यांच्या हस्ते ध्वज दाखवून करण्यात आले. या कार्यक्रमास भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या मोटरसायकल रॅली व पथनाट्यामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ, प्लास्टिकमुक्त पनवेल, अनाथमुक्त भारतचा संदेश व जनजागृती करण्यात आली. याची सुरुवात शहरातील लाइफ लाइन हॉस्पिटल येथून होऊन त्यानंतर आयटीआय, शहीद भोसले पेट्रोल पंप, तक्का, पंचरत्न हॉटेल, उरण नाका, टपाल नाका, कर्नाळा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, त्यानंतर आदर्श हॉटेल, विरुपाक्ष मंदिर, जयभारत नाका, गोखले हॉल, पायोनिअर सोसायटी, गार्डन हॉटेल, जुना पुणे-मुंबई मार्ग, नवीन उड्डाणपूल, एचडीएफसी सर्कल ते डी-मार्टसमोरून खांदेश्वर, नवीन पनवेल पुलाखालून ही रॅली फिरून रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनच्या नवीन पनवेल येथील इमारतीजवळ रॅलीची सांगता करण्यात आली. रॅलीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पथनाट्य सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनच्या अध्यक्षा जयश्री पाटील, सचिव कल्पना नागावकर, डॉ. प्रकाश पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.