Breaking News

आयपीएलमध्ये कोरोनाची एण्ट्री

कोलकाता संघाच्या दोन खेळाडूंना लागण

बंगळुरू ः वृत्तसंस्था
आयपीएलमधील संघ कोलकाता नाइट राइडर्सचे खेळाडू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरीयर या दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोलकाता आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सोमवारी (दि. 3) होणारा सामना रद्द करून पुढे ढकलण्यात आला आहे. आयपीएलमध्ये खेळाडूंना बायो बबलचे सुरक्षाकवच आहे, तसेच कडक नियमावली लागू करण्यात आली. तरीही खेळाडूंना कोरोनाने गाठल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अधिकार्‍यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार कोलकाता संघातील दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे बंगळुरूचे खेळाडू त्यांच्याविरोधात मैदानात उतरण्यास तयार नाही. म्हणून सोमवारचा सामना पुढे ढकलण्यात आला.
आतापर्यंत आयपीएल स्पर्धेत एकूण 29 सामने खेळले गेले आहेत. कोरोना फ्रंट लाइन कर्मचार्‍यांसाठी सोमवारी बंगळुरूचा संघ निळ्या जर्सीसह मैदानात उतरणार होता. या जर्सीचा लिलाव करून मिळालेल्या पैशांतून ऑक्सिजन पुरवठ्यासाठी मदत करण्याचे नियोजन होते, मात्र कोलकाताचे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने हा सामना तूर्त स्थगित करण्यात आला आहे.
चेन्नईच्या गोलंदाजी प्रशिक्षकासह तिघे पॉझिटिव्ह
चेन्नई : कोलकाता कोलकाता नाइट राइडर्स संघातील दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता चेन्नई सुपर किंग्जच्या (सीएसके) संघातही कोरोनाने शिरकाव केला असून, चेन्नईच्या तीन सदस्यांना करोनाची लागण झाली आहे.
इएसपीन क्रिकइन्फो संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि बसचा क्लीनर यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. याव्यतिरिक्त दिल्लीत असलेला उर्वरित संघ कोरोना चाचणीत निगेटिव्ह आढळला आहे. या सर्वांची शेवटची चाचणी रविवारी घेण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल आता समोर आला आहे.
दिल्लीतील स्टेडियममधील पाच कर्मचारी बाधित
नवी दिल्ली ः आयपीएलच्या 14व्या हंगामात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. कोलकाता नाइट रायडर्स संघातील दोन खेळाडू आणि चेन्नई सुपर किंग्ज संघातील तीन सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याच्या वृत्तापाठोपाठ आयपीएलसाठी तिसरा मोठा धक्का बसला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममधील पाच ग्राऊंड स्टाफ मेंबरना कोरोना झाला आहे. यामुळे दिल्लीत होणार्‍या आयपीएलच्या लढती 8 मार्चपर्यंत स्थगित करण्यात आल्याचे वृत्त आहे.

Check Also

एक दिग्दर्शक, एक वर्ष, चार चित्रपट, सर्वच सुपर हिट; मनमोहन देसाईंची कम्माल…

दिग्दर्शक मनमोहन देसाईंच्या चित्रपटात इतकं आवडण्यासारखे काय असते? माहीत नाही. याचा अर्थ त्याबाबत अज्ञान आहे …

Leave a Reply