नेरळमधील स्मशानभूमी आणि कब्रस्तान परिसराची स्वच्छता


कर्जत : बातमीदार
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी (दि. 9) नेरळ गावातील मुस्लिम कब्रस्तान आणि हिंदू स्मशानभूमी परिसराची स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत नेरळमधील 200 हून अधिक श्री सदस्य आणि नागरिक सहभागी झाले होेते.
नेरळ गावात मध्यवर्ती ठिकाणी मुस्लिम कब्रस्तान असलेल्या ठिकाणी रविवारी सकाळी धर्माधिकारी प्रतिष्ठानचे श्री सदस्य पोहचले. त्यांनी तेथे वाढलेली झाडे, झुडपे आणि कचरा गोळा केला. श्री सदस्य कब्रस्तानमध्ये स्वच्छता करीत असल्याचे बघून अनेक मुस्लिम तरुणदेखील तेथे दाखल झाले.
त्यांनीदेखील स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. त्यावेळी तेथे गोळा करण्यात आलेला कचरा डम्पिंग ग्राउंडपर्यन्त नेण्यासाठी ट्रॅक्टरदेखील देण्यात आला होता आणि त्या ट्रॅक्टरच्या मदतीने सर्व कचरा कब्रस्थानच्या बाहेर काढण्यात आला. त्याचवेळी कल्याण रस्त्यालगत असलेल्या हिंदू स्मशानभूमी परिसरातदेखील श्री सदस्यांनी स्वच्छता अभियान राबविले. त्या ठिकाणी 100 हून अधिक श्री सदस्य सहभागी झाले होते. त्यांनी तेथून काढलेला कचरा थेट डम्पिंग ग्राउंडमध्ये नेऊन टाकला. श्री सदस्यांनी नेरळ गावात दुसर्यांदा स्वच्छता अभियान राबविले.