उरण : प्रतिनिधी
उरण तालुक्यात ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावल्याने मागील महिनाभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थंडावा मिळाला असून, यंदा पावसाचे आगमन वेळेत झाल्याने बळीराजा सुखावला आहे. तर झाडे-वेली आनंदाने डोलू लागल्या असून अनेक दिवस पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या पशू-पक्षी आणि वन्य जीवांना दिलासा मिळाला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात शेतीच्या मशागतीची कामे आटपून चातक पक्षासारखे पावसाच्या आगमनाची वाट पाहत असलेला बळीराजाही या पावसाच्या दमदार हजेरीने सुखावला आहे. त्यामुळे भातशेतीच्या पेरणीला प्रारंभ झाला आहे. हवामान खात्याच्या 15 तारखेच्या पावसाच्या अंदाजामुळेही शेतकर्यांमध्ये नैराश्य पसरले होते, परंतु आता शेतीच्या कामांना नियमितपणा आल्याने तालुक्यातील शेतकर्यांनी दमदार पाऊस झाल्याने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.