Breaking News

सिडकोची विक्रमी कामगिरी

केवळ 489 दिवसांत 500 स्लॅबचे काम पूर्ण

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा

मिशन 96च्या अभूतपूर्व यशानंतर, तळोजा नोडमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत साकारण्यात येत असलेल्या महागृहनिर्माण योजनेंतर्गत केवळ 489 दिवसांत 500 स्लॅबचे काम पूर्ण करत सिडको महामंडळाने पुन्हा एकदा सिडको उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली गृहनिर्माण क्षेत्रात विक्रमी कामगिरी केली आहे. सिडकोतर्फे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत साकारण्यात येत असेलेल्या महागृहनिर्माण योजनेंतर्गत नवी मुंबईच्या विविध नोडमध्ये इमारतींचे बांधकाम सुरू आहे. या योजनेतील घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटातील  नागरिकांकरिता उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी, घरांच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता घरांचे बांधकाम कमी कालावधीत पूर्ण करण्यावर सिडकोचा भर आहे. यापूर्वी मिशन 96 अंतर्गत प्रीकास्ट या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करत सिडकोने महागृहनिर्माण योजनेंतर्गत बामणडोंगरी येथे केवळ 96 दिवसांत 96 घरे असलेल्या 12 मजली इमारतीचे बांधकाम पूर्ण केले होते. या वेळेस महागृहनिर्माण योजनेंतर्गत तळोजा येथील सेक्टर-28,29,31 आणि 37 येथे साकारण्यात येत असलेल्या इमारतींमधील 500 स्लॅबचे काम केवळ 489 दिवसांत पूर्ण करत सिडकोने पुन्हा एकदा गृहनिर्माण क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटवली आहे. दिवसाला 1.02 स्लॅब या विक्रमी वेगाने, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून बांधकामच्या दर्जाशी कोणतीही तडजोड न करता सिडकोने हे काम पूर्ण केले आहे. सिडकोतील वास्तुशास्त्रज्ञ, नियोजनकार, अभियंते आणि प्रकल्प सल्लागार एएचसी, टीसीई-एचएसए यांनी डॉ. संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली आखणी करून ही विक्रमी कामगिरी पार पाडली आहे. या कामगिरीद्वारे देशात परवडणार्‍या दरातील गृहनिर्माण क्षेत्रा अंतर्गत वेगाने बांधकाम पूर्ण करण्याचा बहुमान पुन्हा एकदा सिडकोने प्राप्त केला आहे. जागतिक दर्जाच्या इमारतींचे बांधकाम विक्रमी वेगाने पूर्ण करण्याच्या दिशेने सिडकोची वाटचाल वेगाने सुरू झाली आहे.

प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून गृहनिर्माण योजनेतील घरांचे बांधकाम कमी कालावधीत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सिडकोने निश्चित केले आहे. यामुळे गुणवत्तेशी तडजोड न करता सर्वसामान्यांना लवकरात लवकर घरे उपलब्ध करून देत, त्यांचे घराचे स्वप्न साकार करणे सुनिश्चित झाले आहे. 500 स्लॅबचे केवळ 489 दिवसांत पूर्ण केलेले बांधकाम हा या उद्दिष्टातील मिशन 96 नंतरचा पुढील टप्पा आहे.

-डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply