नवी मुंबई ः प्रतिनिधी
सायन-पनवेल महामार्गावर सोमवारी सकाळी टॅक्सी व कारचा अपघात झाला. यानंतर कारचालकाने टॅक्सीची चावी खेचून तेथून पळ काढला. त्यामुळे अर्धा तास टोल नाक्याजवळ चक्काजाम झाला होता. वाशी प्लाझापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नवी मुंबई, पनवेलवरून रोज हजारो नागरिक मोटरसायकल व कारनेच मुंबईत कामाच्या ठिकाणी जात आहेत. त्यामुळे सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत वर्दळ जास्त असते. सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास टॅक्सी व कारचा अपघात झाला. अपघातानंतर चालकाने टॅक्सीची चावी खेचून तेथून पळ काढला. त्यामुळे टॅक्सी रोडमध्येच उभी ठेवावी लागली. परिणामी मुंबईकडे जाणार्या मार्गिकेवर वाहतूक कोंडी झाली. वाहतूक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन क्रेन मागविली. क्रेनच्या साहाय्याने टॅक्सी बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली. चावी पळवून नेणार्या चालकाचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.