अनधिकृत फेरीवाले, भाजीविक्रेत्यांवर कारवाई
![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2019/06/IMG_20190611_142228-1024x487.jpg)
कर्जत : प्रतिनिधी
शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते श्री कपालेश्वर मंदिर या रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाल्यांवर कर्जत नगर परिषदेने कारवाई केली आहे. त्यामुळे या रस्त्याने आता मोकळा श्वास घेतला आहे.
कर्जतमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते श्री कपालेश्वर मंदिर हा रस्ता नगर परिषदेने नो हॉकर्स झोन म्हणून काही वर्षांपूर्वी जाहीर केला होता, तसा ठराव नगर परिषदमध्ये आहे. मात्र नगर परिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या कृपेने या रस्त्याच्या दोन्ही बाजूला फेरीवाल्यांनी बस्तान मांडले होते. त्यामुळे पादचारी व वाहनांना अडचण होत होती. याबाबत नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या, मात्र नगरपरिषद प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत होते. नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव पथकाने कारवाई करून या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या भाजी विक्रेते व फेरीवाल्यांना उठवले आहे.