Breaking News

रायगडात मद्यधुंद चालकाने आठ जणांना उडवले; तिघे जागीच ठार

पाच जखमी, एक अत्यवस्थ

धाटाव, रोहा ः प्रतिनिधी
रेवदंडा येथील जेएसडब्ल्यू येथून रोहा बाजूकडे येणार्‍या एका मद्यधुंद ट्रकचालकाने बुधवारी (दि. 31) सायंकाळी बेदरकारपणे गाडी चालवत साळाव ते चणेरादरम्यान आठ लोकांना उडवले. त्यातील तीन जण जागीच ठार झाले असून, पाच जण जखमी झाले आहेत. यापैकी एक महिला अत्यवस्थ असल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एमएच 04-ईवाय 8501 या गाडीच्या चालकाने रेवदंडा बाजूकडून बेधुंदपणे गाडी चालवत साळाव, आमली येथे प्रत्येकी एक व्यक्तीला, तर चेहेर येथे दोन व्यक्तींना ठोकर मारून जखमी केले. त्यानंतर त्याने भरधाव वेगाने गाडी रोहा बाजूकडे चालवत नेली. पुढील गावात या घटनेची खबर मिळताच स्थानिकांनी हा ट्रक अडविण्यासाठी प्रयत्न केला असता, त्याने अनेक गाड्या व अडथळे उडवून लावत भरधाव वेगाने ट्रक चालवत न्हावे फाटानजीक एका जोडप्याला व त्यांच्या लहानग्या मुलाला उडवले. यामध्ये जि. प. शाळा शिक्षक लक्ष्मण ढेबे व त्यांचा मुलगा जागीच ठार झाला असून, त्यांच्या पत्नीचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत.
धडक इतकी जोरात होती की संबंधित शिक्षकाच्या गाडीचा चक्काचूर झाला असून, गाडी सुमारे चारशे मिटर फरफटत गेली. त्यानंतर ट्रकचालकाने सारसोली गावाच्या पुढे चणेरा येथील नागरिक उदय वाकडे याला ठोकरल्याने ही व्यक्तीदेखील जागीच मृत झाली. भरधाव वेगाने ट्रक चालवणार्‍या या चालकाला चांडगावनजीक स्थानिक युवकांनी धाडसाने पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे.
घटनेचे वृत्त समजताच स्थानिक उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पुढील कार्यवाही सुरू आहे. या घटनेमुळे स्थानिक जनतेमध्ये मोठा प्रक्षोभ आहे.

Check Also

खासदार श्रीरंग बारणे यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करा

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्त पिंपरी-चिंचवडकर खासदार श्रीरंग बारणे …

Leave a Reply