कर्जत : प्रतिनिधी
केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगिरीने प्रभावीत होऊन माथेरानमधील कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुभाष भोसले यांनी बुधवारी (दि. 20) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप कर्जत तालुका अध्यक्ष पंढरीनाथ राऊत, तालुका सरचिटणीस प्रविण पोलकम आणि प्रज्ञा प्रकोष्टचे कोकण प्रांत संयोजक नितीन कांदळगावकर यांनी त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले. काँग्रेस पक्षात आपल्या कामांना योग्यप्रकारे न्याय दिला जात नव्हता. तसेच केंद्र व राज्यातील सरकार जनहिताची कामे करीत आहे. त्यामुळे आपण भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे सुभाष भोसले यांनी सांगितले. यावेळी भाजपचे माथेरान शहर अध्यक्ष विलास पाटील, प्रफुल्ल धारप, बाबू राणे, संजय भोसले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सुभाष भोसले यांची माथेरान शहर भाजप उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.