पनवेल ः बातमीदार
नेरूळ सेक्टर 20मध्ये बालाजी गार्डन नावाने इमारतीचे बांधकाम करणार्या अर्जुन चौधरी या बांधकाम व्यावसायिकाने या इमारतीतील एक फ्लॅट दोन व्यक्तींना विकून फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. नेरूळ सेक्टर 20मध्ये आरोही बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्सच्या वतीने बालाजी गार्डन या इमारतीतील 15 लाख किमतीच्या 1 बीएचके फ्लॅटचे बुकिंग विरेंद्र कोळी यांनी 2014मध्ये केले होते. त्यासाठी त्यांनी पाच लाख 91 हजारांची रक्कम चौधरी याला दिली होती, मात्र या फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करण्यात टाळाटाळ केली होती. 2018मध्ये इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही चौधरी याने रजिस्ट्रेशन केले नाही तसेच हा फ्लॅट दुसर्याला विकल्याचे आढळून आले.