अलिबाग : जिमाका
रायगड जिल्ह्यातील विविध प्रकल्पांची पाहणी करुन त्याचे अहवाल देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले होते. त्यानुसार संबंधित प्रकल्पांची पाहणी मृदा व जलसंधारण विभाग, पाटबंधारे विभाग आणि रायगड जिल्हा परिषद ग्रामिण पाणी पुरवठा विभाग या यंत्रणांनी केली असून, त्यांचे अहवाल जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यातील सर्व धरणे सुरक्षित असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात काळ प्रकल्प व हेटवणे प्रकल्प हे दोन मध्यम प्रकल्प असून त्यांच्यावर आधारीत 49 लघु पाटबंधारे योजना व 36 पाझर तलाव आहेत. रायगड जिल्हा परिषद ग्रामिण पाणी पुरवठा विभागाच्या अखत्यारीत असलेल्या उमटे पाणी साठवण तलावाचा बंधारा सुस्थितीत असल्याचा अहवाल देण्यात आला आहे. सध्या या तलावात 50 टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणाची मुख्य माती भिंत व पाणी सांडवा, ट्रेंच गॅलरी सुस्थितीत आहे. या धरणाच्या सांडवा भिंतीचे व खालील बाजूस असलेल्या वाफा भिंतीचे किरकोळ दगड निघाले असले तरी धरणास कोणताही धोका नाही, असे अहवालात म्हटले आहे.
मृदा व जलसंधारण विभागाकडील दहा तलावांच्या पाहणीचा अहवालही प्राप्त झाला आहे. त्यात साई साठवण तलाव (ता. माणगाव), तळा तळेगाव (ता. तळा), पहूर (ता. रोहा), देवळे (ता. पोलादपूर), खरसई (ता. म्हसळा), नांदळा (ता. महाड), पाषाणे (ता. कर्जत), विन्हेरे (ता. महाड), रातवड साठवण तलाव (ता. माणगाव), रातवड मेंढाण साठवण तलाव (ता. माणगाव) या प्रकल्पांचा समावेश असून, ही सर्व धरणे सुस्थितीत असल्याचे अहवालात नमूद आहे. रायगड पाटबंधारे विभाग -कोलाड अंतर्गत येणार्या लघु पाटबंधारे योजनांचे तलाव सुस्थितीत असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यात रानवली (ता. श्रीवर्धन), पाभरे (ता. म्हसळा), कार्ले (ता. श्रीवर्धन), कवेळे (ता. सुधागड), उन्हेरे (ता. सुधागड), ढोकशेत (ता. सुधागड), घोटवडे (ता. सुधागड), कोंडगाव (ता. सुधागड), वरंध (ता. महाड), कोथुर्डे (ता. महाड), खिंडवाडी (ता. महाड), खैर (ता. महाड), फणसाड (ता. मुरुड), श्रीगाव (ता.अलिबाग), भिलवले (ता. खालापूर), कलोते-मोकाशी (ता. खालापूर), डोणवत (ता. खालापूर), साळोख (ता. कर्जत), अवसरे (ता. कर्जत) या लघु पाटबंधारे योजनांचा समावेश असून ही सर्व धरणे सुस्थितीत असल्याचे अहवालात नमूद केले आहे.