पनवेल ः बातमीदार
मोटार वाहन कायद्यातील तरतुदीचे पालन न करता गोरेगाव येथील एका वित्त पुरवठादार कंपनीने ताब्यात घेतलेल्या दोन ट्रेलरची परराज्यात परस्पर विक्री करून राज्य सरकारचा महसूल बुडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे पनवेल आरटीओने या कंपनीसह वाहन मालकावर सरकारी महसुलाची हानी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याबाबत कळंबोली पोलिसांकडे लेखी पत्रव्यवहार केला आहे. त्यानुसार पोलिसांनी कार्यवाही सुरू केली आहे.
पनवेल आरटीओ कार्यालयात नोंदणी असलेल्या दोन ट्रेलर प्रकारातील वाहनांचा 1 नोव्हेंबर 2013 ते 30 एप्रिल 2016 या तीन वर्षांचा 86 हजारांचा कर थकीत असल्याबाबतचा लेखा परीक्षण अहवाल महालेखापालाने दिला होता. त्यानुसार पनवेल आरटीओकडून या दोन्ही वाहनांचा थकीत कर वसूल करण्यासाठी मोटार वाहन निरीक्षक प्रकाश कर्चे यांना या वाहन मालकांच्या कळंबोली सेक्टर 1 येथील पत्त्यावर पाठविण्यात आले होते, मात्र वाहनमालक पूजा कासवान या तेथील घर विकून गुजरात येथे निघून गेल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पूजा कासवान यांना ट्रेलर घेण्यासाठी आर्थिक मदत करणार्या गोरेगाव येथील मे. सिटी क्रॉप फायनान्स इंडिया लि. या कंपनीच्या गोरेगाव येथील कार्यालयात कर्चे माहिती घेण्यासाठी गेले असता या वित्तीय संस्थेने दोन्ही वाहने ताब्यात घेऊन 2014मध्ये त्या वाहनांची परस्पर परराज्यात विक्री केल्याचे त्यांना समजले. त्यामुळे पनवेल आरटीओने राष्ट्रीय सूचना केंद्राच्या कॉम्प्युटर प्रणालीवर या दोन्ही वाहनांचा शोध घेतला असता एमएच-46-एच-2003 हे वाहन नागालॅँड राज्यात एनएल-02-एल-8097 या क्रमांकाने नवीन नोंदणी झाल्याचे तसेच एमएच-46-एच-2004 हे वाहन पीबी-11-बीआर-0838 या क्रमांकाने पंजाब राज्यात हस्तांतरित झाल्याचे आढळून आले. त्यामुळे वित्तीय संस्थेने केंद्रीय मोटार वाहन नियम 1989मधील नियमांचे पालन न करता तसेच दोन्ही वाहने वित्तीय संस्थेच्या नावे न करता परस्पर विक्री केल्याचे आढळून आले. परिणामी या वाहनांची बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने परराज्यात नोंदणी करण्यात आली असावी, अशी शक्यता आरटीओ विभागाने पोलिसांना दिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. यावरून वाहनमालक पूजा कासवान आणि सिटीक्रॉप फायनान्स इंडिया कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पनवेलचे आरटीओ लक्ष्मण दराडे यांनी पोलिसांना पत्र पाठवले आहे.
-काय आहे नियम? केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार वित्तीय संस्थेने सहाय्य केलेल्या वाहनांच्या नोंदणीबाबत कार्यपद्धती निश्चित केली आहे. या नियमानुसार एखाद्या वित्तीय संस्थेने वाहनमालकाकडून वाहन ताब्यात घेतल्यानंतर नमुना 36मध्ये संबंधित आरटीओ कार्यालयात त्या वाहनांची नोंदणी त्यांच्या नावे करण्यासाठी अर्ज सादर करणे अनिवार्य आहे. वित्तीय संस्थेने नमुना 36चा अर्ज सादर केल्यानंतर त्या वाहनाची नोंदणी वित्तीय संस्थेच्या नावावर करण्याची तरतूद आहे, मात्र मे. सिटी क्रॉप फायनान्स इंडिया या वित्तीय संस्थेने मोटार वाहन कायद्यातील तरतुदीचे पालन न करता ताब्यात घेतलेल्या दोन ट्रेलरची परस्पर विक्री करून सरकारचा महसूल बुडविला आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी कळंबोली पोलिसांकडे लेखी पत्रव्यवहार करण्यात आल्याचे पनवेलचे आरटीओ लक्ष्मण दराडे यांनी सांगितले.