कर्जत : बातमीदार
मध्य रेल्वेच्या भिवपुरी रेल्वे स्थानकातील पादचारी पूल तयार झाल्यानंतर बार्डी गाव आणि शिवसृष्टी वसाहतीकडे जाणारी पायवाट रेल्वे प्रशासनाने बंद केली होती. त्यामुळे रेल्वे स्थानकात येण्यासाठी प्रवाशांना मोठा वळसा घालावा लागत होता. ही समस्या सोडविण्यासाठी चिंचवली ग्रामपंचातीचे तंटामुक्ती अध्यक्ष भरत कांबरी आणि जितेंद्र पाटील यांनी रेल्वे प्रशासनाकडे चर्चा केल्यानंतर अखेर ही पायवाट सुरू करण्यात आली आहे. भिवपुरी रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाचे काम सुरू झाल्यापासून कर्जत बाजूच्या फलाट क्रमांक 1च्या बाजूची पायवाट रेल्वे प्रशासनाने बंद केली होती. त्यामुळे बार्डी गाव आणि शिवसृष्टी वसाहतीमधील नागरिक व प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. अनेकवेळा रेल्वे प्रशासनाकडे मागणी करूनही ही पायवाट खुली करण्यात येत नव्हती. ही वाट खुली करण्यासंदर्भात चिंचवली ग्रामपंचायतीचे तंटामुक्ती अध्यक्ष भरत कांबरी यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. तसेच रेल्वे संघटना अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी रेल्वे प्रशासनाची परवानगी घेऊन या रस्त्याचे काम सुरू केले असून, यासाठी जेसीबी मशीन लावून रस्ता सपाटीकरण सुरू केले आहे. यासाठी संभाजी कांबरी, योगेश कांबरी, उमेश कांबरी, बाळू ठोंबरे, संदेश पाटील आदींनी यशस्वी प्रयत्न केले.
भिवपुरी रेल्वे स्थानकातील पायवाट बंद केल्याने बार्डी आणि शिवसृष्टी वसाहतीमधील रहिवाशांना स्थानकात येण्या-जाण्यासाठी मोठी समस्या निर्माण झाली होती. रेल्वे प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर ही पायवाट जेसीबी लावून खुली करण्यात आली आहे.
-भरत कांबरी, ग्रामस्थ, बार्डी, ता. कर्जत