Friday , September 29 2023
Breaking News

पोलादपूर तालुक्यात प्रयोगशील शेतकरी वाढताहेत

पोलादपूर तालुक्यातील 37 हजार 204 हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी 25 हजार 437 हेक्टर जमीन लागवडीस योग्य असूनही या शेतकरीबहुल तालुक्यात एकीकडे जमीन माफियांचा सुळसुळाट आणि दुसरीकडे बेकारी पराकोटीला पोहोचत आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेऊन प्रत्यक्षात केवळ कागदं रंगविण्याकडे कल असलेल्या शेतकर्‍यांना राजकारण केल्याचा आनंद क्षणिक मिळत असला, तरी काळ्या आईच्या सेवेत आता कोणी शेतकरी रममाण होताना दिसला, तर त्याला शेतीकामाची हौस आहे, असे कौतुकाने म्हटले जात आहे, पण नित्यनेमाने काळ्या आईची सेवा केल्याचे फळ अधिक भरभराट करणारे असूनही शेतकर्‍यांना हे वरदान नको की काय, असे वाटण्याइतपत शेतीविषयक उदासीनता दिसून येत आहे.

तालुक्यात दरवर्षी सरासरी झालेली 3500 हेक्टरवर भातलागवड आणि नाचणी 1650 हेक्टर, तर वरी 800 हेक्टर, तसेच कडधान्यामध्ये तूर 195 हेक्टरवर, तर अन्य कडधान्य 100 हेक्टरवर लावण्यात आल्याची खरिप हंगामाची आकडेवारी सांगत आहे. पाऊस जेव्हा नवरात्रौत्सवानंतरही पडतो तेव्हा तो किड्यांपासून संरक्षण करण्यासह पिकाची प्रत वाढविण्यासही उपयुक्त असतो, अशी शेतकर्‍यांमधील वदंता आता मात्र पावसाने केले नुकसान, मायबाप सरकार भरपाई देईल काय? या वदंतेमध्ये बदलली आहे. त्यामुळेच की काय कृषी विभागाने दिलेली आकडेवारी फुगवून सांगितल्यासारखी वाटते.

खरिप हंगामाप्रमाणेच रब्बी हंगामातही तालुक्यात मूग, चवळी, भुईमूग, वाल, पावटा, कलिंगड, काकडी, वांगी, टॉमेटो, कोबी व भाजीपाला आदी लागवड शेतकर्‍यांकडून केली जाते. पाण्यासाठी पंपाद्वारे उपसासिंचन, तर वनराई बंधार्‍यांचाही वापर केला जातो. तालुक्यात यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जवाहर विहीर व फलोत्पादन योजना धर्तीवर शेततळे योजनादेखील यशस्वी झाली आहे. तुषार संच योजनेत 7500 रुपये प्रतिशेतकरी अनुदान देण्यात येणार आहे. डिझेल पंपासाठी एचडीपीई पाईपसाठी प्रतिशेतकरी 800 मीटर्स पाईपचे अनुदान 25 टक्क्यांप्रमाणे 15 हजार रुपये मर्यादेमध्ये देण्यात येणार आहे. नवीन धान्य विकास आयसोकोन कार्यक्रमांतर्गत भुईमूग व तेलबिया लागवड करणार्‍या शेतकर्‍यांसाठी तेलघाणा सुरू करण्यास केंद्रपुरस्कृत 30 हजारांपर्यंत अनुदानात पंपसंच 5 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट आहे.

पोलादपूर तालुक्यात पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत 43 ग्रामपंचायतींतर्गत 87 गावांचा समावेश असून यात 7 समूह निर्मिती करण्यात आली. यापैकी 26000 हेक्टर क्षेत्र 5 समूहामध्ये समाविष्ट करण्यात आले. ग्रामपंचायतनिहाय सचिवास प्रत्येकी तीन हजार रुपये मानधन देण्याच्या तरतुदीप्रमाणे तालुकास्तरावरील पाणलोट विकास पथकात एमएसडब्ल्यू अर्हताधारक समाजसेवकास 7500 रुपये अनुदेय मानधन, एक महिला सामाजिक कार्यकर्ती व एक पुरुष समाजसेवक यांचा समावेश मानधन तत्त्वावर करण्यात आला, मात्र सद्यस्थितीत सर्वच सचिव आणि पाणलोट सामाजिक कार्यकर्ती व समाजसेवक यांना मानधनाविना या योजनेतून बाजूला होणे भाग पडले आहे.

पोलादपूर तालुक्यात कधीतरी कोणी स्ट्रॉबेरी व भाजीपाला घेत असे, पण तालुका कृषी कार्यालयामार्फत महाबळेश्वरप्रमाणेच अलीकडे पोलादपूर तालुक्यातही स्ट्रॉबेरी व भाजीपाला लागवडीस प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जात आहे. खरिप हंगामात खतांचा पुरवठा पुरेसा होता, तर रब्बी हंगामात गांडूळ आणि बायोडायमेट्रीक्स खतासाठी प्रत्येकी 300 रुपये अनुदानात यंदा 100 शेतकर्‍यांना बॅक्टेरिया पुरविण्यात येणार आहेत. सेंद्रिय खतनिर्मितीसाठी चार शेतकर्‍यांना प्रत्येकी 2500 रुपये गांडूळ खतासाठी देण्यात येणार आहेत, तर राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत कडधान्य लागवडीसाठी 540 किलो झिंक सल्फेट वितरीत करण्यात येणार आहे. 20 नॅपसॅक फवारणी यंत्रांचे वाटप करण्याचे उद्दिष्ट असताना 30 ते 40 शेतकर्‍यांची मागणी येण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय फलोत्पादन कार्यक्रमात 600 चौ. फूट बांधकामासाठी तीन लाखांपैकी 1.5 लाख रुपये अनुदान तत्त्वावर पॅकहाऊस बांधण्यासाठी फळप्रक्रिया उद्योगास देण्यात येणार आहे. भारत संचार निगम लिमिटेडने रायगड व महाराष्ट्र सरकारच्या कृषी खात्याच्या समन्वयाने महाकृषी संचार मोबाईल सेवा विविध सुविधांसह सुरू केल्याने राज्यातील अडीच लाख शेतकरी एकमेकांशी अमर्याद बोलू शकणार आहेत.

पोलादपूर तालुका कृषी अधिकारी कैलास धुमाळ आणि या कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक, तसेच सहायक हे तालुक्यातील शेतकर्‍यांना काळ्या आईच्या सेवेसाठी सरकारच्या या विविध योजनांचे आमिष दाखवून प्रवृत्त करण्यास गावोगाव फिरत असताना अनेक शेतकरी मात्र गावागावांत फिरणार्‍या रियल इस्टेटच्या नावाखाली जमीन माफियागिरी करणार्‍यांकडे काळ्या आईचा सौदा मांडताना दिसत असल्याने ते या वरदानापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

-शैलेश पालकर, खबरबात

Check Also

फलश्रुती काय?

आंतरवली सराटी या गावामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अखेर पोहोचले आणि त्यानंतरच मराठा आंदोलनाचे नेते मनोज …

Leave a Reply