Tuesday , March 28 2023
Breaking News

खोपोलीतील जनजीवन दुसर्या दिवशीही विस्कळीत

पावसाचा सामना करताना नगरपालिकेची तारांबळ

खोपोली : प्रतिनिधी

रविवार व सोमवारी दोन दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसाने खोपोलीत जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. विणानगर, शास्त्रीनगर, लौजी, शीळफाटा, चिंचवली, खालची खोपोली आदी रहिवासी भागात मोठ्या प्रमाणावर पाणी भरल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होऊन संताप व्यक्त झाला. रहिवासी भागात भरलेल्या पाण्याला वाट करुन देण्यासाठी नगरपालिका प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली होती. कुठेही मोठ्या प्रमाणात पाणी भरणार नाही, अशी खोपोली शहराची भौगोलीक रचना आहे. पाताळगंगा नदी व येथील नैसर्गिक नाल्यांना तीव्र उतार असल्याने पाणी थांबत नाही. मात्र रहिवासी व व्यापारी संकुले निर्माण होताना संबंधित विकसकांकडून नियमबाह्य माती भराव तसेच नैसर्गिक नाले व पाणी प्रवाहात बांधकामे करण्यात येत आहेत. त्यामुळे रविवार -सोमवारसारखी जलमय खोपोलीची स्थिती वारंवार निर्माण होत आहे. खोपोलीतील विविध रहिवासी भागात सोमवारी (दि. 8) मोठ्या प्रमाणावर पाणी भरल्याने नागरिकात  प्रचंड  संताप व्यक्त झाला. स्थिती बिघडत असल्याचे लक्षात आल्यावर त्या त्या भागातील स्थानिक नगरसेवक, नगरपालिका यंत्रणा व जोडीला स्थानिक सामाजिक कार्यकर्ते साचलेल्या पाण्याला वाट करून देण्यासाठी झटले. या दरम्यान नगरपालिका कर्मचार्‍यांची मोठी तारांबळ उडाली.

खोपोलीत विविध ठिकाणी पाणी भरण्यास नगरपालिकेचे अपुर्ण नियोजन व काही विकासकांचा मनमानीपणा जबाबदार आहे. त्यावर नगरपालिकेचे कोणतेही नियंत्रण नसल्याने दिवसेंदिवस स्थिती बिघडत असून, नागरिकांना संकटात टाकले जात आहे.

-अमित चोरघे, सामाजिक कार्यकर्ता, खोपोली

सतत मुसळधार पाऊस कोसळल्याने खोपोलीत ठिकठिकाणी पाणी साठले होते. मात्र नगरपालिकेच्या प्रभागनुसार पथकांनी त्या त्या भागातील नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली तुंबलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मोठी मेहनत घेतली. नैसर्गिक नाले अडवून केलेला माती भराव किंवा बांधकामांचे सर्वेक्षण केले जाईल व त्यानुसार कारवाईही केली जाईल.

-गणेश शेटे, मुख्याधिकारी, खोपोली

Check Also

महात्मा फुले महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षपदी परेश ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य …

Leave a Reply