Breaking News

पनवेल ज्येष्ठ नागरिक संघाची सभा

पनवेल ः रामप्रहर वृत्त

येथील पनवेल शहर ज्येष्ठ नागरिक संघाची सभा बुधवारी (दि.10) संघाच्या सभागृहात अध्यक्ष नंदकुमार जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सचिव जयवंत गुर्जर, बी. एन, खेडेकर, जगन्नाथ जोशी यांनी कामकाजात सहाय्य केले. अनुप्रिता काळण यांनी गतवर्षी झालेल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले. सचिवांनी 2018-19 सालात संघाच्या कार्य अहवालाचे वाचन करून माहिती दिली. कोषाध्यक्ष विवेक जोशी यांनी संघाचा जमाखर्च व ताळेबंदाची माहिती दिली.

मानघर येथे गुरुपोर्णिमा उत्सव

पनवेल ः पनवेल तालुक्यातील मानघर-मोसारे येथील श्री स्वामी समर्थ महाराज मठात गुरुपोर्णिमेनिमित्त मंगळवार (दि.16) रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व स्वमीभक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, अशी विनंती स्वामी भक्त संजय आत्माराम पाटील यांनी केली आहे. सकाळी 6 ते 7 स्वामी चरण, मूर्ती अभिषेक, समस्त देवता पूजन, 10. 30 ते 12 वाजता भजन, दुपारी 12 वाजता महाआरती, दुपारी 1 वाजता महाप्रसाद (भंडारा) आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पनवेल तालुका, उरण तालुका, नवी मुंबई, अलिबाग, ठाणे, कल्याण, अलिबाग, दादर आदी ठिकाणाहून  स्वामी भक्त दर्शनांसाठी येत असतात. या उत्सवात स्वामी भक्त संजय पाटील, राजेंद्र पाटील व मानघर-मोसारे स्वामी समर्थ सेवा मंडळ यांचे सहकार्य मिळत आहे.

पनवेलमध्ये शिधापत्रिका अभियान

पनवेल ः अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडील निर्देशानुसार दि. 1 जुलै ते दि. 15 ऑगस्ट या दरम्यान शिधापत्रिकाबाबत विशेष अभियान राबविण्याबाबत सूचना दिली आहे. त्यानुसार पनवेल तालुक्यातील मंडळनिहाय शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. दि. 15 जुलै रोजी पोयंजे, दि. 17 जुलै रोजी कर्नाळा, दि. 19 जुलै रोजी मोर्बे, दि. 22 जुलै रोजी ओवळे, दि0 25 जुलै रोजी पनवेल, दि. 27 जुलै रोजी तळोजे मजकूर, दि. 30 जुलैला पोयजे, दि. 2 ऑगस्ट रोजी केळवणे, दि. 6 रोजी मोर्बे, दि. 9 रोजी गव्हाण, दि. 13 रोजी असूडगाव येथे शिबिर होईल, अशी माहिती तहसिलदार यांनी दिली. नवीन रेशनकार्ड, जीर्ण शिधापत्रिका बदलून देणे आदी कामे शिबिरात केली जाणार आहेत.

कॅमेरा चोराला पकडले

पनवेल ः दिवसभरासाठी भाड्याने घेतलेला सुमारे 35 हजार रुपये किमतीचा कॅमेरा परत न करता पळालेला चोर पुन्हा दुसरा कॅमेरा घेण्यासाठी आला असताना कॅमेरा मालकाने त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना पनवेलमध्ये घडली. कुणाल बिपीन कारिया (31) असे या चोराचे नाव असून पनवेल शहर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तक्रारदार धीरज पवार या तरुणाने कॅनॉन कंपनीचे दोन कॅमेरे भाड्याने देण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी ओएलएक्सवर जाहिरात टाकली होती. तेव्हा कुणालने धीरजच्या मोबाईलवर संपर्क साधून कॅमेरा एक दिवसासाठी भाड्याने घेतला. त्याला पनवेल स्थानकावर बोलावले असता कुणालने कॅमेरा घेऊन 500 रुपये भाडे दिले. त्यानंतर त्याने प्रशांत कोकाटे या नावाचे आधारकार्ड, पॅनकार्ड व वीजबिल आदी कागदत्रांची झेरॉक्स देऊन पळ काढला. मात्र रात्री आठ वाजता कुणालशी संपर्क साधला असता त्याने फोन बंद केला. पत्त्यावर चौकशी केली असता कागदपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यानच्या काळात धीरजने पुन्हा ओएलएक्सवर जाहिरात दिली. त्याच्यावर त्याचा भाऊ व मित्राचे मोबाइल नंबर दिले. तेव्हा कुणाल पुन्हा कॅमेरा घेण्यासाठी आला असता हा तोच आरोपी असल्याचे लक्षात आले आणि त्याला पकडण्यात आले.

एटीएम फोडण्याचा प्रयत्न

उरण ः तळोजा एमआयडीसीतील पेंधरगाव येथील युनियन बँकेचे एटीएम अज्ञात चोराने लोखंडी रॉडच्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. त्याला एटीएम फोडता आले नाही. सीसीटीव्हीमुळे ही बाब उघडकीस आली असून तळोजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी एटीएममध्ये रोख रक्कम भरण्यासाठी आलेल्या कर्मचार्‍यांना हे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे आढळून आले. मात्र त्यातील रोख रक्कम चोरली गेली किंवा कसे याबाबत त्यांना समजू शकले नाही. त्यामुळे कर्मचार्‍याने बँकेकडून एटीएम सेंटरचे सीसीटीव्ही फुटेज मागवून त्याची तपासणी केली असता, या एटीएम सेंटरमध्ये 5 जुलै रोजी मध्यरात्री एक ते एक वाजून दहा मिनिटे या कालावधीत एक व्यक्ती एटीएम सेंटरमध्ये गेल्याचे आढळून आले. या व्यक्तीने तोंडाला काळा रुमाल बांधून लोखंडी रॉडने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले.

एटीएममधून पैसे काढणार्‍याला फसविले

उरण ः तळोजा एमआयडीसीतील एचडीएफसी बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीची भामट्याने दिशाभूल करून त्याच्या एटीएम कार्डची अदलाबदल करीत एटीएम कार्डातून 26 हजार रुपये काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तळोजा पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुभाष बनपट्टी (42) हा तळोजा एमआयडीसीतील कंपनीमध्ये मजूर पुरविण्याचे काम करतो. बुधवारी दुपारी सुभाषने तळोजा एमआयडीसीतील कोहिनूर कॉम्प्लेक्समधील एचडीएफसी बँकेच्या एटीएममधून साडेतीन हजार रुपये काढले. त्यानंतर तो आणखी 10 हजार रुपयांची रोख रक्कम काढत होता. मात्र, एटीएममधून पैसे निघत नव्हते. सुभाष अशिक्षित असल्याने एटीएममधून पैसे कशामुळे निघत नाहीत ते त्याला वाचता येत नसल्याने तो पुन्हा-पुन्हा पैसे काढण्याचा प्रयत्न करीत होता. हा प्रकार एटीएमच्या बाहेर उभ्या असलेल्या भामट्याने पाहिल्यानंतर त्याने सुभाषला एटीएममधून पैसे काढण्यास मदत करण्याच्या बहाण्याने सुभाषकडील एटीएम कार्ड घेऊन त्याचा पासवर्डही मिळवला. त्यानंतर त्याने त्याद्वारे सुभाषला 10 हजारांची रोख रक्कम काढून दिली. त्यानंतर भामट्याने एटीएम कार्डाची अदलाबदल करून एटीएम कार्ड सुभाषला दिले. यानंतर सुभाष तेथून निघून गेला. मात्र काही वेळानंतर त्याच्या बँक खात्यातून रक्कम काढली गेल्याचा मेसेज मिळाल्यानंतर त्याने बँकेत धाव घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याच्या खात्यातून 26 हजार रुपयांची रोख रक्कम एटीएमद्वारे काढण्यात आल्याचे समजले. त्यानंतर त्याने स्वत:जवळचे एटीएम कार्ड तपासले असता, ते दुसर्‍याच्याच नावाचे असल्याचे त्याच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply