रत्नागिरी ः प्रतिनिधी
परशुराम घाटात कोसळलेली दरड बाजूला करण्यात प्रशासनाला यश आले आहे. 16 तासांपासून येथे वाहने अडकली होती. त्यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान होते. तब्बल 16 तासांनंतर मुंबई-गोवा महामार्गावरील एकेरी वाहतूक रविवारी (दि. 28) सुरु झाली. मुसळधार पावसाने रत्नागिरी, रायगडला झोडपून काढले होते. चिपळूण येथे परशुराम घाटातही दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्ग ठप्प पडला आहे. काल दुपारी या घाटात दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. आता या ठिकाणची एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे.
त्याआधी कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. तीन तास कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प होती. माणगावमधील घोट नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडल्याने रत्नागिरी-दादर ही लोकल वीर येथे तर दिवा-सावंतवाडी ही गाडी कोलाड येथे थांबविण्यात आली होती. मंगला एक्स्प्रेस ही गाडी करंजाडी येथे थांबवून ठेवण्यात आली. मांडवी एक्स्प्रेस रोहा येथे थांबविवली होती. तीन तासानंतर या गाड्या मार्गस्थ करण्यात आल्या आहेत.