Breaking News

जलपुनर्भरण, विकेंद्रित जलव्यवस्थापन काळाची गरज

कोकणात दरवर्षी पडणार्‍या पावसाचा विचार केल्यास संपूर्ण राज्याला वर्षभर पाणीपुरवठा करता येईल एवढा पाऊस एकट्या कोकणात पडतो. रायगड जिल्ह्यात सरासरी 3142.64 मिमी पाऊस पडतो. पाणीपुरवठा योजना राबविल्या जातात. त्यावर करोडो रुपये खर्च केले जातात. तरीही जानेवारी महिन्यापासूनच गाव, वाड्या, वस्त्यांवर पाणी समस्या निर्माण होते. पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या कमी होण्याऐवजी दरवर्षी टंचाईग्रस्त गावांची संख्या रायगडात वाढत आहे. पाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण होते. भूजल पातळी कमी होत चालली आहे. यावर वेळीच उपाययोजना केली नाही तर रायगडात पाण्याची भीषण समस्या निर्माण होईल. या समस्येवर मात करण्यासाठी जलपुनर्भरण, विकेंद्रित जलव्यवस्थापन याशिवाय पर्याय नाही. ती काळाची गरज आहे.

रायगड जिल्ह्यात दरवर्षी भरपूर पाऊस पडतो. जेवढा पाऊस जुलै महिन्यात एकट्या रायगड जिल्ह्यात पडतो तेवढा पाऊस  वर्षभरात मराठवाड्यात पडत नाही. असे असताना पाऊस थांबला की पाणीटंचाई निर्माण होते. ऑक्टोबर 2018 ते जून 2019 या कालावधीत रायगड जिल्ह्यात 540 गावे, 1493 वाड्यांमध्ये पाणीटंचाई होती. जून 2019 पर्यंत रायगड जिल्ह्यात 105 गावे व 371 वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. 2018 साली 89 गावे व 273 वाड्यांमध्ये पाणीटंचाई होती. दरवर्षी टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत वाढ होत आहे. ही परिस्थिती का निर्माण होते याचा विचार केला पाहिजे.

पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी दरवर्षी टंचाई कृती आराखडे बनवले जातात. त्यावर करोडो रुपये खर्ची घातले जातात. गावात विहिरी खणायला घेतल्या जातात.  बोअरिंग खणल्या जातात. हे करूनही प्रश्न सुटला नाहीच तर टँकर लावून पाणीपुरवठा केला जातो, पण यामुळे प्रश्न कायमचा सुटत नाही. टँकर ही तात्पुरती उपाययोजना आहे. पुढच्या वर्षी याच गावात पुन्हा पाणीटंचाई निर्माण होते. पुन्हा शासनाचा निधी खर्च होतो. दरवर्षी यावर करोडो  रुपयांचा खर्च होतो, परंतु पणीटंचाईची समस्या सुटत नाही.

राजस्थानमध्ये दरवर्षी सरासरी 200 मिमी पाऊस पडतो, पण हे पाणी तेथील जनतेला वर्षभर पुरते. शेतीसाठीही या पाण्याचा वापर होतो. शेतकरी कमी पाण्यातील पीक घेऊन शेती करतात. हे शक्य झाले डॉ. राजेंद्र सिंग यांनी केलेल्या जलक्रांतीमुळे. शासनाची एक रुपयाही मदत न घेता त्यांनी राजस्थानमध्ये तब्बल 11 हजार 500 बंधारे बांधले. मृत झालेल्या नद्या जिवंत केल्या आणि कायम दुष्काळी प्रदेश असलेला राजस्थान या समस्येतून बाहेर आला.

जे राजस्थानमध्ये घडले ते रायगडातदेखील घडू शकते. त्यासाठी लोकांची मानसिकता बदलावी लागेल. पाऊस भरपूर पडतो म्हणून पाण्याचे महत्त्व समजत नाही. म्हणून रायगडातील लोकांना पाण्याचे महत्त्व पटवून द्यावे लागेल. जल पुनर्भरण करणे, विकेंद्रित जलव्यवस्थापन, जलस्रोत गाळमुक्त करणे, जुन्या बंधार्‍यांची दुरुस्ती करणे यावर जोर द्यावा लागेल.

रायगड जिल्ह्यात मोठी धरणे बांधण्यापेक्षा लहान लहान बंधारे बांधण्यावर जोर द्यायला हवा. नदी, ओढे यातून वाहून जाणारे  पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरवावे लागेल. मोठ्या धरणांची गरज नाही. लहान धरणांची, बंधार्‍यांची गरज आहे. मोठी धरणे ही खर्चिक असतात. मोठ्या धरणाच्या किमतीत नद्यांवर लहान लहान धरणे अथवा बंधारे घातले तर त्यासाठी येणारा खर्च कमी असेल. विकेंद्रित स्वरूपात पाणी अडवले जाईल. त्याचा फायदा आसपासच्या लोकांना होईल. साठलेले पाणी जमिनीत जिरल्याने भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होईल आणि पाणी समस्या कायमची निकाली निघेल.  शासनाच्या मदतीवर अवलंबून न राहता लोकचळवळीतून, सामाजिक संस्थांच्या मदतीने हे काम करावे लागणार आहे. यासाठी चळवळ उभी करावी लागेल. जलसाक्षरता करावी लागेल. हिरवळ प्रतिष्ठान व डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे काम करीत आहेत. त्याला शासनाने साथ दिली पाहिजे. जनतेनेही त्यांना हात द्यायला हवा. 

रायगड जिल्ह्यात वनराई बंधार्‍यांची कामे करण्यात आली आहेत. जुने बंधारे आहेत. हे बंधारे गाळाने भरले आहेत. ते दुरुस्त करून गाळमुक्त करायला हवेत. डोंगर पायथ्यांच्या कमी उताराच्या भागात नैसर्गिक डोह असतात. त्यातील गाळ काढून स्वच्छ करणे हे जलसंचयनाचे चांगले काम होऊ शकते. रायगड जिल्ह्यात नैसर्गिक साधनसंपत्ती व सिंचनक्षमता मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यांचा प्रभावीपणे वापर केल्यास ग्रामविकासाचा चांगला आदर्श निर्माण होऊ शकेल. रायगडाला निसर्गाचे वरदान लाभले आहे. भरपूर पाऊस या जिल्ह्यात पडतो. निसर्गातून मिळणार्‍या या पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करून पाणीटंचाई दूर करता येईल. पाणी अडवा आणि पाणी जिरवा या संकल्पनेवर पुन्हा एकदा काम करावे लागणार आहे. पाण्याच्या जुन्या स्त्रोतांना जीवदान देणे, मृत झालेल्या नद्यांना जिवंत करणे, गाळाने भरलेल्या नद्यांची पात्रे साफ करणे, नद्यांवर लहान लहान बंधारे घालून पाण्याचे नियोजन करणे ही काळाची गरज आहे. वैयक्तिक व सामूहिक प्रयत्नांतून हे काम केल्यास रायगड जिल्ह्यातील पाणीटंचाई नक्कीच दूर होऊ शकेल.

-प्रकाश सोनवडेकर, खबरबात

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply