Breaking News

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले दिसून आले.

यंदा पहिल्यांदा महायुती सरकारच्या वतीने अर्थमंत्री अजित पवार यांनी लेखानुदानाचा प्रस्ताव ठेवला. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्यात लागू होणार असल्याने राज्याचा अर्थसंकल्प न मांडता या वेळी चार महिन्यांसाठीचे लेखानुदान मांडले गेले, मात्र मोदी सरकारच्या विकासाभिमुख कार्यक्रमाला पूरक असेच हे महाराष्ट्र सरकारने मांडलेले लेखानुदान आहे. त्यात गतिमान सरकारचा विकासाभिमुख चेहरा स्पष्टपणे दिसून येतो. अर्थात, नेहमीप्रमाणे विरोधी पक्षांनी त्यावर टीका केलीच. टीका करणे हे विरोधी पक्षाचे काम असतेच. त्यात चुकीचे काहीच नाही. तथापि, अर्थमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना विरोधकांचा जो काही समाचार घेतला त्याला तोड नाही. कुठलाही अभ्यास न करता विनाकारण शेरेबाजी केल्यावर काय होते याचा धडा विरोधकांना मिळाला असेल. कुठल्याही ठोस मुद्यावर बोलण्याऐवजी विरोधकांनी निव्वळ राजकीय स्वरुपाची टीकाटिप्पणी करण्यावर समाधान मानले. वास्तविक या सार्‍या प्रकाराला महायुती सरकारचा विजय म्हणणेही जड जाते, कारण खमका आणि कणखर विरोधी पक्ष समोरच्या बाकांवर असता तर सत्ताधारी पक्षाला अर्थसंकल्पीय अधिवेशन असे सोपे गेले नसते. दुर्दैवाने विरोधी पक्षाचा सारा रोख माध्यमांमध्ये चालणार्‍या बातम्यांबाबतच राहिला. महाविकास आघाडी सरकार असताना विरोधी पक्षाची मदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असे. स्वत: फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार किंवा प्रवीण दरेकर यांच्यासारखे सदस्य सत्ताधारी पक्षाला घाम फोडत असत. नुकत्याच संपलेल्या अधिवेशनात या ऊर्जेचा मागमूसदेखील दिसला नाही. अंतरवाली सराटीमधून मराठा आंदोलकांचे नेते मनोज जरांगे-पाटील काय बोलत आहेत, समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह टीकाटिप्पणी कुणी केली, विधिमंडळाच्या लॉबीमध्ये शिवसेनेचे मंत्री दादा भुसे आणि शिवसेनेचेच आमदार महेंद्र थोरवे यांच्यामध्ये धक्काबुक्की कशी झाली असल्याच किरकोळ बाबींमध्ये विरोधी पक्ष रमून गेला होता. साहजिकच मुख्यमंत्र्यांनी त्याचे सारे उट्टे आपल्या भाषणात काढले. लेखानुदानावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांची चांगली खरडपट्टी काढली. शुक्रवारी दुपारभर विधिमंडळाच्या लॉबीमध्ये भुसे-थोरवे यांच्यात झालेल्या कथित धक्काबुक्कीचीच चर्चा होती. वास्तविक धक्काबुक्कीचा प्रकार घडलाच नसल्याचा खुलासा दोन्ही बाजूंनी करण्यात आला. तथापि, सभागृहात याबद्दल बोलण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांपाशी जाऊन टीका केली. गेल्या अडीच वर्षांत महाराष्ट्राची सभ्य संस्कृती रसातळाला गेली असल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात आव्हाड यांचा मग खरपूस समाचार घेतला. आव्हाड यांना संस्कृतीची भाषा शोभत नाही, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मुख्यमंत्रीपदी आल्यानंतर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल टाकत राज्याचा कारभार अधिक गतिमान केल्याचे त्यांनी सांगितले. सरकारी पदांवर भरतीची प्रक्रिया सुरू झाली असून शासन आपल्या दारी या कार्यक्रमामार्फत दोन कोटींहून अधिक नागरिकांना लाभ झाल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबई परिसरात मुख्यमंत्र्यांनी डीप क्लीन ड्राइव्हसारखा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. तुम्ही तिजोर्‍या धुतल्या, आम्ही रस्ते धुतो. बारीक लक्ष देऊन काम करावे लागते. फेसबुक लाइव्ह करून ते जमत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. एकंदर अधिवेशनात विरोधी पक्ष चारीमुंड्या चीत झाला असेच म्हणावे लागेल.

Check Also

कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड

जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील …

Leave a Reply