Breaking News

सायबर हल्ल्याची चुणुक!

फेसबुक-इन्स्टाग्राम बंद पडले तेव्हा भारतात रात्रीची वेळ होती तर अमेरिकेत दिवसाला सुरूवात होत होती. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीतील एक महत्त्वाचा दिवस, ‘सुपर ट्यूस’डे असताना सकाळीच फेसबुक, इन्स्टाग्राम बंद पडल्याने हा मोठा सायबर हल्ला आहे की काय याची भीती तिकडे व्यक्त होऊ लागली. एकंदर दोनएक तासासाठी जगभरातील लाखो लोक भयग्रस्त झाले खरे!

भारतात मंगळवारी रात्री साधारण नऊ वाजण्याच्या सुमारास फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापरकर्त्यांना काहिसा विचित्र अनुभव येऊ लागला. ‘तुमचे सेशन संपले आहे. कृपया लॉगआऊट करा’ असा संदेश अनेकांना फेसबुकवर पहायला मिळाला तर ‘लॉगआऊट’ झालेल्या कित्येकांना पुन्हा सुयोग्य पासवर्ड टाकूनही ‘लॉगइन’ होता येईना. याचवेळी इन्स्टाग्रामवरही ‘समथिंग इज राँग’ असा संदेश दिसू लागला. ही वेळ म्हणजे तरुणाईची रात्रीचे जेवण आटोपून मित्रमंडळींशी इन्स्टाग्रामवर जोडले जाण्याची वेळ, तर प्रौढ मंडळीही निद्राधीन होण्याआधी या सुमारास फेसबुकवर थोडा वेळ घालवतात. अशा मोक्याच्या वेळेला फेसबुक व इन्स्टाग्राम ठप्प झाल्याने अनेक जण बुचकळ्यात पडले. पुन्हा पुन्हा योग्य तो पासवर्ड टाकूनही लॉगइन होता येत नाही हे कित्येकांना भयशंकित करून गेले. गेले काही दिवस अनेकांची फेसबुक खाती हॅक झाल्याचे कानावर पडलेले, फेसबुकवरच वाचायला मिळालेले होते. आपले फेसबुक खाते हॅक झाल्याने आता आपल्यालाही आर्थिक फटका बसणार की काय, या विचाराने अनेकांची झोप उडाली. तर तरुणाई ‘आता काय करायचे’ या विचाराने हवालदिल झाली. ज्यांची ‘एक्स’वर (पूर्वीचे नाव ट्विटर) खाती होती त्यांनी तिकडे धाव घेतली. एक्स आणि व्हॉट्सपवरून बहुतेकांना ही समस्या जागतिक स्वरुपाची असल्याचे कळून चुकले. दोनच दिवसांपूर्वी लाल समुद्रातील चार केबलवर हुथी बंडखोरांच्या कथित हल्ल्यांमुळे जगभरातील इंटरनेट सेवा बंद होण्याची भीती व्यक्त केली गेली होती. काहींना फेसबुक, इन्स्टाग्राम बंद पडणे हे त्यातूनच झाले असावे असे वाटले. दोन नामांकित समाजमाध्यमे एकाच वेळी मोठ्या प्रमाणात बंद पडण्याची ही पहिलीच वेळ असल्याने अनेकांचे धाबे दणाणले. कित्येकांसाठी ही माध्यमे व्यवसायाचाही मोठा आधार आहेत. अशा मंडळींनी चिंताक्रांत होणे स्वाभाविक होते. त्यात बराच काळ हे कशामुळे झाले आहे, त्याचे कारण समोर न आल्यामुळे अनेक वापरकर्ते संतप्तही झाले. इतक्या बलाढ्य समाजमाध्यम कंपनीकडे ‘चॅट’वर आधार देणारी सुविधा नसावी याचा कित्येकांनी निषेध केला. दरम्यान, ‘एक्स’ हा समाजमंच सुरळीत सुरू असल्याचे ध्यानात येताच फेसुबकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग व त्यांची फेसबुक व इन्स्टाग्राम चालवणारी कंपनी ‘मेटा’ यांची लोकांनी ‘एक्स’वर तुफान खिल्ली उडवली. झुकरबर्ग आदल्या दिवशीपर्यंत भारतातील बडे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी गुजरातमधील जामनगर येथेच मुक्कामाला होते. त्या अनुषंगानेही अनेकांनी मीम्सचा पाऊस पाडला. एकीकडे ही गंमतजंमत सुरू होती तर तिकडे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सायबर सुरक्षा विभागाकडून ‘आपली यंत्रणा परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहे. तूर्तास तरी कोणताही मोठा सायबर हल्ला असावा असे दिसत नाही’ असा खुलासा करण्यात आला. एकंदर जगभराला मोठ्या सायबर हल्ल्याची हलकीशी चुणुक फेसबुक-इन्स्टाग्राम कोलमडण्याच्या या छोट्याशा घटनेने दाखवली. अखेरीस दोनेक तासांत मेटाकडून संबंधित तांत्रिक बिघाड दूर करण्यात आला आणि जग पुन्हा एकदा सुरळीतपणे ‘ऑनलाईन’ जोडले गेले.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply