सध्या पाऊस भरपूर प्रमाणात पडत आहे. पावसाळयात आजारांचे प्रमाण वाढते. या पार्श्वभूमीवर पावसाळयात आहाराबाबत घ्यावयाची काळजी याबाबतचा लेख.
आयुर्वेद हे एक प्राचीनतम भारतीय वैद्यकशास्त्र आहे. आयुर्वेदाने एका वर्षाचे सहा वेगवेगळ्या कालामध्ये विभाजन केले आहे. या सहा कालखंडालाच ऋतू असे म्हटले आहे. प्रत्येक ऋतूत आढळणारे हवामान, आजुबाजूची परिस्थिती त्या कालावधित शरीरात असणारी वातपित्तकप या त्रिदोषांची स्थिती या सर्वांचा समग्र विचार करुन शरीरासाठी हितकर आरोग्यदायी अशा बाबींचे सविस्तर मार्गदर्शन म्हणजे ऋतूचर्या. शरीरातील दोघांदिकाची अत:स्थिती व नित्य बदलती वातावरणातील बाह्यस्थिती यातील विरोध टाकून सुसंवाद निर्माण करुन आरोग्य कायम ठेवणे हेच या
ऋतुचर्येचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
नेमिची येतो पावसाळा असे असले तरीही या ऋतूत आरोग्याच्या दृष्टीने विशेष काळजी घेणे महत्वाचे ठरते. वर्तमान परिस्थितीत कालमापनानुसार सामान्यपणे अंशत: ज्येष्ठ, आषाढ, श्रावण (अंशत:) हे हिंदुमास म्हणजे सामान्यपणे जुन उत्तरार्ध ते ऑगस्ट पूर्वार्ध या महिन्यात महाराष्ट्रात आसमंतात हा ऋतू दिसून येतो.
दोषस्थिती : ग्रीष्म ऋ्तुतील तीव्र सूर्यसंतापामुळे वातावरणात सर्वत्र रुक्षता वाढलेली असते व यामुळे शरीरात देखील रुक्षता वाढून वातप्रकोप होतो. बाह्य वातावरणातील आर्द्रता यामुळे भूक मंदावते, खालेल्या अन्नाचे नीट पचन होत नाही त्यामुळे अशक्तपणा जाणवतो. पावसाळ्यात दूषित पाणी व वनस्पती नव्याने उगावलेल्या असल्याने त्यामध्ये आम्लरस अधिक्य असल्याने पित्त दोषाचा संचय होण्यास सुरुवात होते.
आहाराचे नियोजन : या ऋतूत दौर्बल्य फार मोठ्या प्रमाणात आलेले असते. अशावेळी शक्तीवर्धक पदार्थाचे सेवन करावे असे आपल्याला वाटेल पण अडचण ही की हे सर्व शक्तीवर्धक पदार्थ पचायला जड असतात. त्यामुळे पचायला सोपे व शक्तीवर्धक अशा पदार्थाची योजना वैद्याच्या सल्याने युक्तीपूर्वक करुन घ्यावी. भूक नसताना उपवास करणे किंवा थोडी भूक शिल्लक ठेवून जेवण करणे अधिक फायद्याचे असते.
या ऋतूत (अग्नि) भूक हळूहळू वाढविणे महत्वाचे आहे. आणि नंतर भूक वाढल्यावरच बल्य आहार घ्यावा. याबाबत आयुर्वेदामध्ये अग्नी (भूक) कसा वाढवावा, याचे सुंदर उदाहरण दिले आहे. विस्तवाची छोटी ठिणगी असेल व त्या ठिकाणचा आग्नि वाढवायचा असेल तर प्रथमत: गवताची एक एक काडी घालून आग्नि चांगला प्रज्वलीत करावा लागतो. व तो चांगला प्रज्वलीत झाला की मग अधिक प्रमाणात गवत घालता येते. जर सुरुवातीसच त्या असणार्या अल्पशा ठिणगीवर एकदम गवताचा भारा टाकला तर आग्नि पेटण्याऐवजी तो पूर्णाशाने विझून जाईल. शरीरातील जठराग्निचे पण असेच आहे. पावसाळ्यात भूक कमी लागत असल्याने पचायला हलका असा आहार घ्यावा.
न्याहरी (नाष्टा) ज्यांना काही अपरिहार्य कारणामुळे उशीरा जेवावे लागते त्यांनी न्याहरीसाठी उपमा घ्यावा. तो गव्हाचा रवा/पीठ यांचा करावा. त्यामध्ये आर्द्रक, लिंबू, कडिनिंब, लसूण यासारखी दीपन द्रव्ये टाकावीत. मुरमुरे चा चिवडा, राजगिरा लाडू आदी पदार्थ घ्यावेत. नाष्ट्यात इडली, डोसा आदी पदार्थही या ऋतूत घेऊ नयेत कारण त्यावर आंबवण्याची प्रक्रिया केलेली असते.
तळलेले पदार्थ मात्र कटाक्षाने टाळावेत. कारण तळलेले पदार्थ हे पचायला जड व पित्त वाढविणारे असतात. पावसाळ्यात ढगाळ वातावरणात पाऊस पडत असताना गरम भजी, बटाटेवडा आदी खाण्याची इच्छा होते. थंड हवेत गरमागरम असे हे पदार्थ खाण्याने तात्पुरते बरे वाटत असले तरी परिणामत: ते रोगोत्पादक ठरणारे असते हे निश्चित लक्षात घ्यायला पाहिजे. अगदी पापड खावयाचा असेल तर तो भाजूनच खावा तळून नव्हे. बेकरी पदार्थांपैकी ब्रेड खाणे या ऋतूत चांगले नाही. त्याऐवजी भाजून बनविलेल्या टोस्ट लोणी लावून खायला हरकत नाही.
जेवण : जेवणामध्ये तर्हेतर्हेची पक्वाने टाळावीत. मूगाचे वरण, हुलगयाचे पिठले, भाकरी, चपाती असे सहज पचणारे पदार्थ जेवणात घ्यावेत. स्वयंपाकामध्ये हिंग, सुंठ, मिरे, पिंपळी, आले, लिंबू, पूदीना, कोथींबीर, लसून यासारखे दीपन पाचन करणारी द्रव्ये अधिक प्रमाणात वापरावीत. सर्वच मसाल्याचे पदार्थ अग्नीवर्धक करणारे व रुची वाढविणारे असल्याने या पदार्थांचा अधिक प्रमाणात वापर करावा. विशेषत: लसूणाचा वापर या ऋतूमध्ये अधिकाधिक प्रमाणात करणे इष्ट ठरते. कारण लसून हा उष्ण, स्निग्ध असून उत्तम वातनाशक व अग्निवर्धक आहे.
या ऋतूत पालेभाज्याचा वापर करु नये. दुधी भोपळा, दोडका, पडवळ, भेंडी आदी फळभाज्याचा उपयोग अधिक प्रमाणात करावा. मूग, मसूर या डाळीचे वरण वापरावे. त्यामुळे शरीरात वाढलेल्या वातदोष कमी होते. आहारात चांगले तूप हे वातपित्तनाशक आणि भूक वाढविणारे शरीराला बळ देणारे असे आहे. धृत पित्तनिलहरं रस शुक्रजसा हितम असे तुपाचे महत्व ग्रंथकारानी सांगितले आहे.
दही या ऋतूत अगदी निषीद्ध आहे. चांगले गोड, ताजे ताक मात्र अवश्य प्यावे. ताक हे भूक वाढविणारे असे उत्तम आहारद्रव्य आहे. याउलट दही अभिष्यन्दी क्लेशकारक आणि अग्निमांद्यकर आहे.
भाज्या : दुधीभोपळा, भेंडी, दोडका, भाजलेल्या वांग्याचे भरीत, फ्लॅावर, पडवळ, सुरण, चुका, माठ ई. भाज्या करताना लसून फोडणीचा वापर करावा. पुदीना चटणी, लसून चटणी, पंचामृत ई. चा वापर करावा.
मसाले : हिंग, सुंठ, मिरे, आले, कोथींबीर, लसून, लिंबू ,पिंपळी, दालचिनी, जिरे गुळ, कांदा आदीचा वापर करावा.
पाणी : या ऋतूत सर्व आढि, नदी, नाले तुंडूब भरुन वाहतात. त्यामुळे पाणी अशुद्ध असते. त्यामुळे त्या पाण्याचे शुद्धीकरण करुनच ते पाणी प्यावे यासाठी मेडिक्लोरचा वापर करावा. त्यामुळे गॅस्ट्रो, कॉलरा, अतिसार आदी जलजन्य आजार टाळता येणे सहज शक्य आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने या ऋतूत सिद्धजल घेण्यासाठी सांगितले आहे. सिद्धजल म्हणजे आद्रक, बडीशेप इ. औषधी द्रव्ये टाकून पाणी उकळून घेणे. हे असे पाणी गरम – कोमट पिल्यास अधिक फायदेशीर असते.
फळे : डाळींब, चिकू, द्राक्षे, खजूर, बोर, नारळ, लिंबू ई. फळे घ्यावीत.
काय करावे : पावसाळ्यात भिजू नये म्हणून रेनकोट, जर्किन, गमबूट, टोपी ईत्यादीचा वापर करावा., उन्हाळ्यात थंड पाण्याने स्नान करण्याची सवय एकदम बदलून गरमपाणी न घेता क्रमाक्रमाने गरम पाणी घ्यावे.
काय टाळावे : भूक न लागता जेवन करु नये., नाचणी, बाजरी, मका ईत्यादी तसेच ताज्या पालेभाज्या ग्रीन सॅलड आदी टाळावे., इडली, दोसा ई आंबलेले पदार्थ टाळावे., पंचपक्वाने, मिठाई मांसाहार, सुकेमासे टाळावे., फ्रीजचे पाणी पीने टाळावे., कडधान्य, पावटे, चवळी इत्यादी मोड आलेली धान्ये उसळी, बटाटा, साबुदाना ई. पदार्थ टाळावे., कलिगंड, फणस, काकडी ईत्यादी फळे टाळावीत.
विशेषत: जेव्हा दिवसभर भरपूर संततधार पाऊस पडत असतो. कोंदट व दमट हवेमुळे मन निरुत्साही बनलेले असते. कोणतेही काम करण्यामध्ये रस राहत नाही. अगदी कंटाळा येतो, अशा दिवसाचे वर्णन करताना ग्रंथकार या दिवसाचा दुर्दिन म्हणून उल्लेख करतात. अशा दिवशी गरम पाणी प्यावे. झोपू नये. याउलट पत्ते, कॅरम, बुद्धिबळ वगैरे बैठे खेळ खेळावेत.
या ऋतूत वातदोषाचा प्रकोप होत असल्याने वातशमनासाठी बस्ती चिकित्सा (विविध औषधी द्रव्यांनीयुक्त एनिमा) अवश्य करुन घ्यावी.
-डॉ.व्यंकट धर्माधिकारी
सहाय्यक संचालक (आयुष)
कोकण भवन, नवी मुंबई