Breaking News

ओडिशातील रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा 261वर

900हून अधिक जण जखमी

भुवनेश्वर : वृत्तसंस्था
ओडिशातील बालासोरमध्ये तीन ट्रेनच्या झालेल्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा 261वर पोहचला असून 900हून जास्त लोक जखमी झाले आहेत. शोध आणिबचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे,  तर जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
बालासोर जिल्ह्यातील बहनागा रेल्वेस्थानकाजवळ शुक्रवारी (दि. 2) शालीमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस, बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि मालगाडी यांच्यात धडक होऊन भीषण अपघात झाला. बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस हावडा येथे जात होती. शुक्रवारी सायंकाळी उशिरा या गाडीचे काही डब्बे रुळावरून घसरून बाजूच्या रुळावर उलटले. त्याचवेळी शालीमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस चेन्नईच्या दिशेने दुसर्‍या रूळावरून धावत होती. ही ट्रेन बंगळुरू-हावडा एक्स्प्रेसच्या रूळावर उलटलेल्या डब्यांना धडकली. या धडकेनंतर कोरोमंडल एक्स्प्रेसचे काही डब्बे रूळावरून घसरले आणि पुढील रूळावर येत असलेल्या मालगाडीच्या डब्ब्यांना धडकले.
अपघाताची घटना शुक्रवारी उशिरा समोर आली तेव्हा 50 जणांचा मृत्यू झाला होता. बचावकार्य सुरू करताना मृतांची संख्या वाढत गेली तसेच जखमी प्रवाशांची संख्याही वाढली. या अपघातातील मृतांचा आकडा हळूहळू वाढत जाऊन 261वर पोहचला आहे, तर जखमींची संख्या हजाराच्या आसपास झाली आहे. त्यामुळे अवघ्या देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मदतीकार्यासाठी विविध यंत्रणा कार्यरत आहेत. एनडीआरएफ टीमलाही पाचारण करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर लष्करानेही या मदत आणि बचावकार्यात भाग घेतला आहे.
दरम्यान, या अपघातानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. याचबरोबर मुंबई-मडगाव वंदे भारत ट्रेनच्या लोकार्पणाचा सोहळा रद्द करण्यात आला आहे.
मदतीची घोषणा
या अपघातानंतर रेल्वे खात्याकडून मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची, तर गंभीर जखमींना दोन लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय पंतप्रधान मदत निधीतूनही मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली गेली आहे.
चौकशीचे आदेश
ओडिशामध्ये झालेला हा रेल्वे अपघात देशातील मागच्या दोन दशकांतील सर्वांत मोठा अपघात आहे. 1999नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अपघातस्थळी भेट देऊन उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घटनास्थळी पाहणी; जखमींची विचारपूस


बालासोर : ओडिशातील रेल्वे अपघातस्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि. 3) भेट देऊन माहिती घेतली तसेच पाहणीनंतर रुग्णालयात जाऊन जखमी प्रवाशांची विचारपूस केली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव सोबत होते. या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ही एक वेदनादायक व गंभीर घटना आहे. प्रत्येक कोनातून चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दोषी आढळलेल्यांना कठोर कारवाई केली जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळी पाहणी करून उपस्थित बचावकार्य पथकातील कर्मचार्‍यांशी संवाद साधला. घटनास्थळावर उपस्थित असलेले कॅबिनेट सचिव आणि आरोग्यमंत्र्यांसोबतही त्यांनी चर्चा केली. घटनास्थळावर पाहणी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जखमींना भेटण्यासाठी थेट रुग्णालयात गेले. तेथे त्यांनी जखमी प्रवाशांसोबत संवाद साधला तसेच डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली. या वेळी त्यांनी शोकग्रस्त कुटुंबांना गैरसोयीचा सामना करावा लागणार नाही आणि जखमींना आवश्यक ती मदत मिळत राहावी यासाठी विशेष काळजी घेण्याचे निर्देश दिले.

Check Also

पनवेलमध्ये रविवारी खासदार श्रीरंग बारणे यांचा भव्य नागरी सत्कार

पनवेल ः रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघात सलग तीन वेळा विक्रमी मताधिक्याने निवडून आलेले लोकप्रिय …

Leave a Reply