पाणी घुसल्याने कागदपत्रे, फाईल्स भिजल्या
पनवेल : वार्ताहर
नवीन पनवेल येथील सिडको इमारतीतील असलेल्या मेट्रो सेंटरला गेल्या तीन दिवस सुरू असलेल्या पावसाचा फटका बसला. इमारतीतील स्लॅबमधून पावसाचे पाणी जोरात कार्यालयात पडल्याने सर्व ठिकाणी पाणीच पाणी साचले होते. या वेळी या कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे, फाईल भिजल्या.
गेल्या पाच ते सहा दिवस रायगड परिसरासह पनवेलला मुसळधार पावसाने झोडपले आहे. पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने पावसाळी गटारातील पाणी बाहेर वाहू लागले. या मुसळधार पावसाचा फटका नवीन पनवेल येथील सिडकोने बांधकाम केलेल्या इमारतीतील मेट्रो सेंटर कार्यालयाला बसला. या पावसामुळे इमारतीच्या छतावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने ते पाणी स्लॅबला गळती लागल्यामुळे कार्यालयात स्लॅबमधून पाण्याच्या धारा लागल्या होत्या. या साचलेल्या पाण्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी यांची त्रेधातिरपीट उडाली. या साचलेल्या पाण्यामुळेखाली असलेले महत्त्वाचे कागदपत्रे आणि फाईलीसुद्धा भिजल्या.
या वेळी उपजिल्हाधिकारी मेट्रो सेंटर, अधिकारी व कर्मचारी यांनी लागलीच उपाययोजना केल्या. त्याचबरोबर या पाण्यामुळे कार्यालयात वीज बोर्डामध्ये शॉर्ट सर्किट झाले होते. अधिकार्यांनी सिडको कार्यालयात कळविले होते. तसेच वीज वितरण कार्यालयातसुद्धा याबाबत माहिती देण्यात आली होती. या वेळी वीज वितरण कर्मचार्यांनी दुरुस्ती केली. अशाप्रकारे मोठा पाऊस पुन्हा आल्यास या कार्यालयात पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिडकोने वेळीच उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.