Breaking News

विरोधकांनी आत्मचिंतन करावे

ईव्हीएमवरून गळे काढणार्‍यांना मुख्यमंत्र्यांचा टोला

वर्धा : प्रतिनिधी

इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमुळे भाजपचा विजय झाला, ईव्हीएममध्ये घोळ आहे, असे म्हणत गळे काढणार्‍या विरोधकांना आत्मचिंतनाची गरज असल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने शुक्रवारी (दि. 2) वर्धा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ईव्हीएमवर अविश्वास दाखविणे म्हणजे जनतेवर अविश्वास दाखविण्यासारखे आहे, असे सांगून, ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी आंदोलन करण्यापेक्षा आपला पराभव का झाला? लोकांनी आपल्याला का नाकारले? याचा विचार करा, असा खोचक सल्ला मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी विरोधकांना दिला. या मुद्द्यावर विरोधकांची एकजूट होऊन काही फरक पडणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीतले लोक आमच्या पक्षात येण्यास इच्छुक आहेत, मात्र आम्ही काही जणांनाच प्रवेश दिला आहे. कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी काही पक्ष त्यांना शपथा देताहेत, पण शपथ देणारे तरी राहतील का, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.

जागावाटपाबाबत आमचे ठरले आहे. काही अडचणी आहेत, पण एकत्र येऊन लढायचे ठरवले की काही गोष्टी सोडाव्या लागतात, असे सांगून, आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीचा अभूतपूर्व विजय होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

महाजनादेश यात्रेला मिळणारा प्रतिसाद ही आम्ही पाच वर्षांत केलेल्या कामांची पोचपावती आहे. दुष्काळमुक्ती आमचे यापुढील ध्येय असेल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

दरम्यान, महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने शहरी पक्ष म्हणून ओळखला जाणारा भारतीय जनता पक्ष आता ग्रामीण मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करीत आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply