ठाणे : प्रतिनिधी
महिलांनी घराचा अर्थिक कणा बनणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास तसेच महिला व
बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी महालक्ष्मी सरस 2019 प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केले. ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत आगरी-कोळी सांस्कृतिक भवन, नेरूळ, नवी मुंबई येथे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन कार्यक्रमास आमदार मंदा म्हात्रे, आमदार रमेश पाटील, उमेदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, रवींद्र शिंदे तसेच राज्यातील बचत गटांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पंकजा मुंडे म्हणाल्या, हा कार्यक्रम ग्रामीण भागातील महिलांचा असल्यामुळे व मी स्वत: ग्रामीण भागातील असल्यामुळे बचत गटातील महिलांचा मला जास्त जिव्हाळा आहे. बदलत्या काळात महिलांनी घराचा अर्थिक कणा बनणे गरजेचे आहे. तेव्हाच घराचा विकास शक्य आहे. जेथे बचत गटाची संख्या जास्त तेथे महिला आत्महत्यांचे प्रमाण कमी असते, असेही त्यांनी नमूद केले.
गरिबांचे जीवनमान उंचावण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानमार्फत वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यात येतात. 34 जिल्ह्यांच्या 351 तालुक्यांत इंसेंटिव्ह पध्दतीने काम सुरू आहे. या माध्यमातून एकूण पाच लाख बचतगटांची स्थापना झाली असून त्यात सुमारे 43 लाख कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. वर्षभरात शासनाने 520 कोटींचे अर्थसहाय्य दिले असून बँकांमार्फत 5250 कोटींचे कर्ज उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झालेल्या राज्यातील स्वयंसहाय्यता बचतगटांना मुंडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले. बचतगटांच्या उत्पादनाला चांगली बाजारपेठ उपलब्ध होऊन त्यांच्या मालाची अधिकाधिक विक्री व्हावी जेणेकरून महिलांचे जीवनमान उंचावेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्रातील तसेच भारतातील विविध राज्यांतील स्वयंसहाय्यता गट व ग्रामीण भागातील कारागीर सहभागी झाले आहेत. यामध्ये 120 स्टॉल्स असून त्यामध्ये खाद्यपदार्थांचे 20 स्टॉल्स आहेत. ग्रामीण महिलांनी व कारागिरांनी तयार केलेल्या विविध कलाकुसरीच्या वस्तू, ग्रामीण भागातील अस्सल खाद्यपदार्थ या प्रदर्शनात उपलब्ध आहेत. या प्रदर्शनास जास्तीत जास्त नागरिकांनी भेट देऊन उत्पादनांची खरेदी करावी, तसेच खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहनही मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.