पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील युवक-युवती तसेच बचतगटातील महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी मनपातर्फे मुद्रा लोन मेळावा व मार्गदर्शन शिबिर गुरुवारी (दि. 29) सकाळी 11 वाजता शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे.
उपक्रमाचे उद्घाटन रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते व सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. उद्घाटन समारंभास महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, विविध समित्यांचे सभापती, अध्यक्ष व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे मुद्रा बँक समितीच्या महाराष्ट्र सदस्य वर्षा भोसले व रायगड जिल्हा समन्वय समिती सदस्य कल्पना राऊत यांची उपस्थिती असणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्रा बँक योजना 8 एप्रिल 2015 रोजी कार्यान्वित केली. या योजनेंतर्गत कोणत्याही प्रकारचे तारण वा जामीनदाराशिवाय होतकरू बेरोजगारांना कर्जपुरवठा केला जातो. शिशुगट 50 हजार, किशोर गटासाठी पाच लाख, तर तरुण गटासाठी 10 लाखांपर्यंत कर्ज देण्यात येते. जास्तीत जास्त तरुण-तरुणी व महिला बचत गटाच्या सदस्यांनी उपस्थित राहून उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पनवेल महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.