नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरबाबत राहुल गांधींनी केलेली विधाने निंदनीय आहेत. त्यांच्या विधानांचा पुरावा म्हणून वापर करीत पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रात भारताविरोधात याचिका दाखल केली आहे, मात्र आता राहुल गांधींना आपली भूमिका बदलावी लागली. कारण देशातील जनतेनेच त्यांच्यावर रोष व्यक्त केला आहे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर घणाघात केला. दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जावडेकर म्हणाले की, काँग्रेसने आपल्या वागणुकीने देशाला लाज आणली आहे. राहुल गांधींनी जम्मू-काश्मीरबाबत जी वक्तव्ये केली आहेत ती निंदनीय आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये काहीही ठीक चाललेले नाही. तेथे हिंसाचार सुरू असून अनेक काश्मिरींचा मृत्यू झाल्याचा दावा त्यांनी केला होता. राहुल गांधी कुठून ही माहिती मिळवत आहेत, असा सवालही या वेळी जावडेकर यांनी केला.
काँग्रेसचे वागणे त्यांच्या वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण व व्होट बँकेचे राजकारणही आहे. देशातील जनतेने राग व्यक्त केला तेव्हा राहुल गांधींना दबावाखाली येत आपल्या विधानावरून यू-टर्न घ्यावा लागला, अशी टीकाही जावडेकर यांनी राहुल गांधींवर केली, तसेच मणिशंकर अय्यर यांचे जे विचार आहेत, तेच काँग्रेसचे खरे विचार आहेत. त्याच विचारांचे दर्शन राहुल गांधींनी आपल्या या विधानांमधून घडवले. त्यामुळे काँग्रेस आणि राहुल गांधी या दोघांनी देशाची माफी मागायला हवी, असेही जावडेकर यांनी स्पष्ट केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper