मुंबई ः प्रतिनिधी
राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक संजय बर्वे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुंबई पोलीस आयुक्त सुबोधकुमार जयस्वाल यांना राज्याच्या महासंचालकपदी बढती देण्यात आली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर सेवानिवृत्त होत असल्याने सुबोधकुमार जयस्वाल यांना बढती मिळाली आहे.
राज्याचे विद्यमान पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या कारकिर्द या महिनाअखेरीस पूर्ण होत आहे. त्यांच्या जागी जयस्वाल यांना बढती मिळणार हे जवळजवळ निश्तित झाले होते. मात्र, त्यांच्या जागी म्हणजेच मुंबईच्या महत्त्वाच्या पोलीस आयुक्तपदी कोण नियुक्त होणार याबाबत चर्चा सुरू होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक बर्वे यांच्याबरोबरच अप्पर पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) परमबीर सिंह यांच्या नावाची चर्चा होती. अखेर बर्वे यांना या पदाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुबोध जयस्वाल यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती होत असताना, बर्वे यांचे नाव शर्यतीत होते. सतीश माथुर पोलीस महासंचालकपदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी तेव्हाचे मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी सुबोध जयस्वाल आणि बर्वे यांची नावे चर्चेत होती. त्यावेळी मात्र बर्वे यांना मुंबई पोलीस आयुक्तपदाने हुलकावणी दिली होती. त्यावेळी त्यांची राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. संजय बर्बे हे 1989 च्या बॅचचे, तर सुबोधकुमार जयस्वाल हे 1985 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.