नागोठणे : प्रतिनिधी
सर्व सभासदांची एकजूट, एकमेकांवरील विश्वास, श्री गणेशावरील अतूट भक्ती याचा मिलाफ झाल्याने येथील प्रभूआळीतील रामेश्वर मंदिरात श्री सन्मित्र मित्रमंडळाच्या वतीने सलग 46 वर्षे साजरा होत असलेला गणेशोत्सव आता सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करीत आहे.
1974च्या दरम्यान नागोठणेच्या प्रभूआळीतील तरुणांनी कायस्थ प्रभू समाजाच्या जुन्या रामेश्वर मंदिरात गणपती आणायचा अशी कल्पना मांडली. त्यासाठी गावातून वर्गणी गोळा करावयाची असे सर्वानुमते ठरविण्यात आले आणि नंदकुमार गुरव, बबन गुरव, दिलीप शृंगारपुरे, दिलीप पिंपळे, अनिल सरदार, शेखर भिसे, प्रदीप दुर्वे, विलास भिडे, सुधीर पत्की, वसंत महाजन, रघुनाथ रटाटे, गणेश सहस्रबुद्धे, उल्हास गरुडे आदी तरुण मंडळी उत्साहाने कामालाही लागली. 1974 साली या मंदिरात गणेशोत्सवाच्या परंपरेची मुहूर्तमेढ यशस्वीपणे रोवली, ती अगदी आजच्या 2019 पर्यंत कायम आहे.
1974 साली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गावातील काही प्रतिष्ठित मंडळींसह व्यापार्यांकडून आठ आणे ते दोन रुपये देणगी घेऊन गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता. तेव्हापासून आजपर्यंत आपला घरातीलच गणपती आहे या उदात्त भावनेने सर्व सदस्य तन- मन-धन अर्पून गणेशाची सेवा करीत आहेत. यावर्षी ’रेडामुखी वेदमंत्र’ हे ज्ञानेश्वरांच्या अद्वितीय कार्यावर आधारित सात मिनिटांचे चलतचित्र साकारण्यात आले. हा देखावा बघण्यासाठी शेकडो गणेशभक्त दररोज मंदिरात येत आहेत.
2009मध्ये या मंडळाने श्री सन्मित्र मित्रमंडळ या नावाने धर्मादाय आयुक्तांकडे कायमस्वरूपी नोंदणी करून नागोठण्यातील पहिले सरकारी नोंदणीकृत मंडळ बनण्याचा मान मिळविला होता. सध्या कीर्तिकुमार कळस (अध्यक्ष), जयेंद्र गुरव (उपाध्यक्ष), राजेश भिसे (सचिव), अजय अधिकारी (खजिनदार) आदी पदाधिकार्यांसह उदय भिसे, राजेंद्र गुरव, धनाजी दपके, अमोघ विळेकर, गणेश (बाळा) गुरव, अरुण गुरव आदी कार्यकारी मंडळ कार्यरत आहे. यावर्षीच्या गणेशोत्सव समितीचे राजेंद्र गुरव (अध्यक्ष), हर्षल दुर्वे (उपाध्यक्ष), सुभाष सरदार (सचिव), बाळासाहेब गुरव (कोषाध्यक्ष) आदी पदाधिकार्यांसह सदस्य काम पाहत आहेत. गेल्या 46 वर्षांपासून सदरचा गणेशोत्सव येथील कायस्थ प्रभू समाजाच्या पुरातन रामेश्वर मंदिरात साजरा केला जात आहे.