Breaking News

वैनगंगेला पूर; सतर्कतेचा इशारा

भंडारा : प्रतिनिधी

मध्य प्रदेशातील संजय सरोवराचे पाणी सोडण्यात आल्याने वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. मंगळवारी (दि. 10) कारधा येथील लहान पुलावरून वैनगंगेचे पाणी वाहत असल्याने या मार्गावरून वाहतूक बंद करण्यात आली. सिहोरा-वाराशिवनी या आंतरराज्य मार्गावरील पुलावरून बावनथडी नदीचे पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूकसुद्धा बंद करण्यात आली. भंडारा शहराला लागून असलेल्या ग्रामसेवक कॉलनीतील काही घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे दोन मिटरने उघडण्यात आले आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी पूरस्थितीची पाहणी केली असून वैनगंगा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. मध्य प्रदेशातील संजय सरोवराच्या खोर्‍यातही जोरदार अतिवृष्टी होत असल्याने या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. या पाण्यामुळे वैनगंगा नदीच्या पातळीत वाढ झाली होती, परंतु पुन्हा अतिवृष्टी झाल्याने संजय सरोवराचे 10 दरवाजे 1.85 मिटरने उघडण्यात आले. त्यातून 75,400 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असल्याने वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडून नदीला पूर आला आहे. वैनगंगेची धोक्याची पातळी 245.00 मिटर आहे. आता ही पातळी 245.32 मिटरवर पोहचली आहे. जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाल्याने अनेक मार्गांवर पाणी आल्याने मार्ग बंद करण्यात आले आहेत. करचखेडा-सुरेवाडा, सिहोरा-बपेरा, तामसवाडी हे मार्ग बंद करण्यात आले आहेत, तर भंडारा शहरानजीकच्या ग्रामसेवक कॉलनीत पुराचे पाणी शिरले आहे. भंडारा येथील स्मशानभूमी मार्गावर पाणी असल्याने अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला आहे. वैनगंगेच्या जलसाठ्यात प्रचंड वाढ झाल्याने पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे 2 मिटरने उघडण्यात आले आहेत. त्यातून 4,85,192 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

महाराष्ट्र-मध्यप्रदेशचा संपर्क तुटला

संततधार पाऊस आणि धरणाचे पाणी नदीपात्रात सोडल्याने सिहोरा परिसरातून वाहणार्‍या वैनगंगा आणि बावनथडी नद्यांना पूर आला आहे. या दोन नद्यांचा संगम बपेरा गावाच्या शेजारी आहे. आंतरराज्यीय पुलावर पाच फूट पाणी असल्याने महाराष्ट्र-मध्य प्रदेश राज्याचा संपर्क तुटला असून शेकडो प्रवासी सीमावर्ती गावात अडकले आहेत. पुराचे पाणी देवरी गावाच्या शिवारात शिरल्याने 100 एकरहून अधिक क्षेत्रातील धानाचे पीक गेल्या 48 तासांपासून पाण्याखाली आहे. गोंडीटोला, सुकडी नकुल, बपेरा, चुल्हाड, परसवाडा या नद्यांच्या काठावरील गावांत हीच स्थिती आहे. बावनथडी नदीचे पाणी संगमनजीक अडल्याने नदीला पूर आला आहे. याच नदीवर महाराष्ट्र-मध्य प्रदेश राज्याला जोडणारा पूल आहे. या पुलावर पाच फूट पाणी आल्याने संपूर्ण वाहतूक बंद आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply