Breaking News

पनवेल तालुक्यात डेंग्यूचे थैमान, आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन

पनवेल तालुक्यात डेंग्यूचे थैमान,

आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन

पनवेल ः बातमीदार

पनवेल तालुक्यात नोव्हेंबर महिन्यात डेंग्यूचे 17 रुग्ण  आढळले असून महापालिका हद्दीतदेखील संशयितांचे प्रमाण वाढले आहे. डेंग्यूच्या वाढत्या प्रभावामुळेे परिसरात घबराट पसरली आहे. तर उरणमध्ये 9 डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत.

अचानक जोरदार ताप, तीव्र अंगदुखी, कंबरदुखी, डोळ्यांच्या खोबणीत, त्याभोवती तीव्र दुखणे, खूप थकवा अशी डेंग्यूची खास लक्षणे साध्या डेंग्यूमध्ये काही रुग्णांमध्ये दिसतात, पण अनेकदा साधा डेंग्यू व इतर विषाणू-ताप यांच्या लक्षणांमध्ये फरक नसतो. डेंग्यूचा ताप हा जीवघेणा ठरू शकतो. उपचाराअभावी रुग्ण दगावतातही.

डेंग्यू हा लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. कारण त्यांच्यात रोगप्रतिकारशक्ती कमी असते. डेंग्यू हा विषाणूबाधित एडिस एजिप्टाय डास चावल्यामुळे होतो. त्या डासाची पैदास स्वच्छ पाण्यावर होते व हा दिवसा चावतो. डेंग्यूची लागण झालेल्या व्यक्तीला ताप येतो. सांध्यामध्ये असह्य वेदना होतात. डेंग्यू हा आजार कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो, मात्र प्रामुख्याने लहान मुलांना डेंग्यू संसर्गाचा धोका अधिक असतो. त्यामुळे प्रत्येकाने डेंग्यूची काळजी घ्यायलाच हवी.

पंचायत समिती आणि ग्रामपंचायततर्फे आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळण्याचे आवाहनही करण्यात येत आहे, मात्र काही ठिकाणी भंगारवाले, उघड्यावर ठेवलेले टायर्स, नारळ, काम सुरु असलेल्या इमारती तसेच पाणी साचणार्‍या विविध वस्तू यामध्ये पाणी साचत असल्याने डास यामध्ये अळ्या घालतात. परिणामी डासांची उत्पती होत आहे. तालुक्यात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून औषध फवारणी करण्याचे काम हाती घ्यायला हवे, अशी मागणी केली जात आहे.

नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन नेरे येथे 3 रुग्ण, वावंजे येथे 8 रुग्ण, गव्हाण येथे 4 रुग्ण, आजिवली येथे 2 रुग्ण असे एकूण 17 रुग्ण पनवेल तालुक्यात सापडले आहेत. पावसाळ्यात डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांनी डोके वर काढू नये, रोगराईला आळा बसावा यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येतात. असे असले तरीदेखील डेंग्यूचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. या डेंग्यूपासून बचावासाठी नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply