नैना प्रकल्पग्रस्तांचा निर्धार मेळावा उत्साहात
पनवेल ः प्रतिनिधी
नैना प्रकल्प येणार असेल तर त्यांनी सगळ्या सुविधा वेळेत दिल्या पाहिजेत. कोणत्याही शेतकर्यावर अन्याय व्हायला नको. रस्ते, उद्याने, मूलभूत सुविधा वेळीच देणे गरजेचे आहे, शिवाय हे करताना येथील शेतकर्यांना तिथे रोजगार दिला पाहिजे. यासाठी भारतीय जनता पक्ष सातत्याने भूमिपुत्र, शेतकरी, कष्टकरी, प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. शेतकर्यांच्या हिताचे जे आहे ते आम्हाला करायचे आहे, असा निर्धार भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि.24) येथे व्यक्त केला. ते निर्धार मेळाव्यात बोलत होते.
नैना प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपच्या वतीने पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास आमदार महेश बालदी, भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, माजी नगरसेवक हरेश केणी, बबन मुकादम, माजी नगरसेविका दर्शना भोईर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयूरेश नेतकर, भाजप अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित जाधव, माजी जि.प. सदस्य ज्ञानेश्वर घरत, ज्ञानेश्वर भोईर, केळवणे जि.प.विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, माजी पं.स. सदस्य भूपेंद्र पाटील, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, नांदगाव सरपंच विजेता भोईर, उसर्लीचे माजी सरपंच विजय भगत, सिडकोचे अधिकारी मानकर, जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे आदींसह मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी नैना प्रकल्पाबद्दल लोकांच्या मनात असलेल्या शंका-कुशंका, निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी व ज्या शेतकर्यांची जमीन गेली आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज हा निर्धार मेळावा आयोजित केला असून यासाठी लोकनेते दि. बा. पाटीलसाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की, जे जनतेच्या हिताचे आहे ते आम्हाला करायचे आहे. आज कोणी तरी समजूत करून देतोय की हे आमच्या विरोधात आहे. आमची घरे उठवणार आहेत. जमिनी ताब्यात घेणार आहेत, पण कोणी आपली जमीन ताब्यात घेत नाही. आपल्यासाठी स्कीम बनवत असताना आपले म्हणणे ऐकले जाते. विकासासाठी रस्ते लागतात, मात्र ही जागा द्या सांगणारे शेतकर्यांचे दुश्मन असल्याचे सांगितले जाते. सोशल मीडियावर कार्टून बनवली जातात, पण राजकारण बाजूला ठेवून जे शेतकर्यांच्या हिताचे आहे तेच झाले पाहिजे, अशी भूमिका आमची व इथे बसलेल्यांची असल्याने आम्ही ताठ मानेने पुढे जाऊ शकतो.
पैसे खाल्ल्याने जे तुरुंगात बसलेत त्यांचे लोक आम्हाला शेतकर्यांचे विरोधक बोलतात, पण आम्ही विकासाचे राजकारण करीत असताना कर्नाळा बँक बुडवल्यावर शेतकर्यांना पैसे मिळवून देणार्यांना शेतकर्यांचा दुष्मन ठरवू पाहत आहेत. आम्ही सिडकोला सांगितले आहे की, नैना प्रकल्प करताना कोणाच्याही घरावर नांगर फिरवू नये, कोणाच्याही घराला धक्का लागू नये ही आमची आग्रही मागणी आहे. ती आम्ही त्यांच्याकडून मान्य करून घेणार आहोत. रस्त्यासाठी किवा इतर सुविधांसाठी जर सिडकोला जागा लागणार असेल तर बाजार भावाप्रमाणे आणि अन्य निकषाप्रमाणे पैसे दिले पाहिजेत, असेही आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले.
आम्ही विकासाच्या बाजूने -आमदार महेश बालदी
या वेळी आमदार महेश बालदी यांनी सांगितले की, सिडको आणि सरकार यांच्यामध्ये आम्ही त्यांना जोडणार्या पुलाचे काम करीत आहोत. नैना प्रकल्पग्रस्तांसाठी आंदोलन करणार्या विरोधकांच्या आंदोलनाची खिल्ली उडवताना त्यांनी म्हटले की, विरोधकांनी आंदोलन केले त्यांचा अजेंडा एकाच होता आमदारांना शिव्या देण्याचा. त्याने आम्हाला काय फरक पडला नाही. लोक जमत नाहीत म्हणून कुस्त्या ठेवल्या, नाटक ठेवले आणि खाऊन-पिऊन उपोषण केले. त्यांचे बरे असते प्रदर्शनासाठी उपोषण करायचे तेही साखळी उपोषण करायचे म्हणजे खाऊन-पिऊन उपोषण. उपोषण अर्धवट सोडून नागपूरला कोण गेले ज्यांनी प्लॉट घेतले आहेत, कारण त्यांची पॉलिसी शेतकर्यांना गोंधळात टाकण्याची आहे. आम्ही नैनाच्या बाजूचे म्हणजे त्यांच्या सगळ्या गोष्टी मान्य करीत नाही. आम्ही विकासाच्या बाजूचे आहोत.
- सिडको अधिकार्यांनी केली भूमिका स्पष्ट
प्रारंभी सिडकोचे जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांनी 174 गावांचा समावेश असलेल्या नैना प्रकल्पाची प्रेझेंन्टेशनद्वारे माहिती दिली. त्यानंतर सिडकोचे अधिकारी मानकर यांनी प्रकल्पग्रस्त न म्हणता तुम्ही स्वत:ला प्रकल्प भागधारक म्हणून घ्या, असे सांगून शेतकर्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. अंशदान शुल्क हे शेतकर्याला भरायला लागणार नसल्याचे सांगून त्याला शासनाची स्थगिती असल्याचेही ते म्हणाले. मूलभूत सुविधा आणि पाणी, रस्ते याबाबत प्रस्ताव सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. ज्यांच्या घरांचा किंवा चुकीचे भूखंड दिले असल्याचा प्रश्न असेल तोही चर्चा करून सोडवू, असेही आश्वासन त्यांनी या वेळी दिली.