पनवेल ः वार्ताहर
मराठी शिक्षण कायदा व मराठी भाषा विकास प्राधिकरण स्थापित करावे, अशी मागणी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रायगड जिल्हा कमिटीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदन देतेवेळी ‘कोमसाप’चे उत्तर रायगडचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण, केंद्रीय प्रतिनिधी गणेश कोळी, सुखद राणे, समन्वयक अ. वि. जंगम, सुधीर शेठ, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश पाटील, प्रतिनिधी स्मिता गांधी, पूजा वैशंपायन, जनार्दन सताणे यांच्यासह जिल्ह्यातील सदस्य उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की, मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असूनही दिवसेंदिवस शिक्षण व व्यवहारात मराठीचे महत्त्व कमी होत चालले आहे. मराठी शाळेची पटसंख्या रोडावल्याने मराठी शाळा बंद होत आहेत; तर भविष्यात शिक्षण घेणारे मराठी भाषेपासून वंचित राहतील. एक न मिटणारी भाषिक दरी रुंदावत जाईल. त्यामुळे शासनापुढे अनेक पेच उभे राहतील. भविष्यातील हा भाषिक असमतोल साधण्यासाठी पहिली ते बारावीपर्यंत मराठी हा विषय अनिवार्य करण्यासाठी शिक्षण कायदा करावा, तसेच मराठी राज्यभाषेचा सर्वदूर वापर वाढावा. राज्य व केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयांमधून
महाराष्ट्रात प्राधान्याने मराठीतच व्यवहार होण्यासाठी मराठी भाषा विकास प्राधिकरण कायद्याद्वारे स्थापन करावे.