Breaking News

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा धावांचा डोंगर

मोहाली : वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने शिखर धवनचे शानदार शतक (143 धावा) आणि रोहित शर्माचे अर्धशतक (95) यांच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर डावांचा डोंगर उभारला. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 9 बाद 358 धावा केल्या.

धमाकेदार सुरुवात करणार्‍या भारतीय जोडीने भारताला दीड शतकी सलामी मिळवून दिली, मात्र भारताचा हिटमॅन रोहित शर्मा याचे शतक हुकले. तो 92 चेंडूंत 95 धावा करून बाद झाला. रिचर्डसनने रोहितला बाद करीत 193 धावांवर भारताला पहिला धक्का दिला. रोहितने 7 चौकार आणि 2 षटकार खेचले. सलामीवीर शिखर धवनने धमाकेदार शतक ठोकले. त्याने चौकार लगावत 98 चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. झंझावाती शतक ठोकणार्‍या शिखर धवनचे दीड शतक मात्र हुकले, पण त्याने चोख कामगिरी बजावली. 115 चेंडूंत 143 धावांची तुफानी खेळी करून तो बाद झाला. त्याने 18 चौकार आणि 3 षटकार लगावले.

सलग दोन सामन्यांत शतक झळकावणार्‍या कर्णधार कोहलीला या सामन्यात फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. तो 6 चेंडूंत 7 धावा करून माघारी परतला. रायडूच्या जागी संधी मिळालेल्या लोकेश राहुलला चांगली सुरुवात मिळाली, मात्र तो 31 चेंडूंत 26 धावा काढून बाद झाला. ऋषभ पंतने 24 चेंडूंत 4 चौकार आणि 1 षटकार खेचत 36 धावा जोडल्या. 1 चौकार आणि 2 षटकार लगावत विजय शंकरने 15 चेंडूंत 26 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून कमिन्सने पाच बळी घेतले.

गेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडलेल्या भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजीची निवड केली. भारतीय संघात चार बदल करण्यात आले होते. विश्वचषक स्पर्धेच्या तयारीत असलेल्या टीम इंडियात झालेल्या बदलानुसार महेंद्रसिंह धोनीच्या स्थानावर ऋषभ पंतला संधी देण्यात आली. चौथ्या क्रमांकावर अंबाती रायडूच्या जागी के. एल. राहुल, मोहम्मद शमीच्या जागी भुवनेश्वर कुमार आणि रवींद्र जडेजाच्या जागी यजुवेंद्र चहल यांना संधी देण्यात आली.

रोहित नवा ‘सिक्सर किंग’

हिटमॅन रोहित शर्माने चौथ्या एकदिवसीय सामन्यात 95 धावांची  दमदार खेळी साकारली. ही खेळी करताना रोहितने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला पिछाडीवर टाकले आहे. या सामन्यात रोहितने दोन षटकार लगावले आणि धोनीचा विक्रम मोडीत काढला. यापूर्वी एकदिवसीय क्रिकेटमध्ये धोनीच्या नावावर 217 षटकार होते. आता रोहितच्या नावावर 218 षटकार झाले आहेत.

Check Also

नमो चषक महोत्सवाचा शनिवारी पारितोषिक वितरण सोहळा

माजी क्रिकेटपटू तथा प्रशिक्षक दिलीप वेंगसरकर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त लोकप्रिय पंतप्रधान …

Leave a Reply