Breaking News

वेलकम अभिनंदन!

आज होणार सुटका; भारताच्या इशार्‍याने पाक वरमले

इस्लामाबाद, नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पाकिस्तानच्या ताब्यात असलेला भारतीय वैमानिक अभिनंदन वर्धमान यांना शुक्रवारी (दि. 1) सोडण्यात येणार आहे, अशी घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तान संसदेत केली. अभिनंदन यांना सुखरूप सोडा अन्यथा ठोस कारवाई करण्याचा इशारा भारताने दिला होता. त्याची गंभीर दखल घेत पाकने नरमाईचे धोरण स्वीकारत पायलटला सोडण्याचा निर्णय जाहीर केला. पायलट अभिनंदन हे वाघा बॉर्डरमार्गे भारतात दाखल होणार आहेत.

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय हवाई दलाचे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना सुखरूप सोडवण्यासाठी भारताने आपली भूमिका स्पष्ट केली होती. कोणतीही चर्चा न करता पाकिस्तानने आमच्या पायलटला भारतामध्ये पाठवावे, अशी कठोर भूमिका भारताने घेतली. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेकडे भारत सरकारची भूमिका स्पष्ट केली होती.

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने तातडीने भारतामध्ये पाठवावे. अभिनंदन प्रकरणावरून कोणतीही देवाणघेवाण केली जाणार नाही. या प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड होईल आणि चर्चेचा पत्ता आपल्या हातात आहे, असे पाकिस्तानला वाटत असेल तर ती त्यांची चूक आहे. अभिनंदन यांना पाकिस्तानकडून चांगली वागणूक दिली जावी, अशी भारताची अपेक्षा असल्याची माहिती सूत्रांनी ‘एएनआय’ला दिली होती. अभिनंदन प्रकरणावरून पाकिस्तानपुढे कोणत्याही पद्धतीने नमते घेण्याची भारताची तयारी नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. पाकिस्तान सध्या कंधार प्रकरणाप्रमाणे भारतावर दबाव बनवण्याच्या विचारत आहे. असे असले तरी वर्धमान यांच्या सुटकेप्रकरणी कोणतीही चर्चा करण्यास भारत तयार नसून त्यांची तातडीने सुटका करण्यात यावी हीच भारताची भूमिका असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

आता केवळ प्रॅक्टीस होती खरं काम तर नंतर करू.  आता पाकिस्तानच्या कुरापतींना भारत बिलकूल थारा देणार नाही.जशास जसे उत्तर दिले जाईल.
-नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply