द्रुतगती महामार्गावर 20 लाख 79 हजारांचा दंड वसूल
पनवेल : वार्ताहर
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर नजीकच्या काळात मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. विशेषतः भरधाव वेगात लेनची शिस्त न पाळल्यामुळे हे अपघात होत असतात. अनेकांना यामध्ये आपला जीव गमवावा लागतो. लेनची शिस्त न पाळणार्या वाहनचालकांविरोधात महामार्ग पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलत तीन महिन्यात सुमारे 20 लाख 79 हजार 400 रुपयांचा दंड वसूल केला आहे. जुलै 15 ते सप्टेंबर 18 पर्यंतच्या कालावधीत राबविलेल्या विशेष मोहिमेत हा विक्रमी दंड महामार्ग पोलिसांनी वसूल केला आहे. द्रुतगती महामार्गवर वाहने थांबविण्यास मनाई असताना देखील अनेक अतिउत्साही वाहनचालक रस्त्याच्या कडेला वाहन उभे करून फोटो, सेल्फी काढण्यात मग्न असतात. एकीकडे भरधाव वेगाने येणारे वाहन त्यात काही वाहनचालकांचा धिंगाणा या प्रकारासह विनाकारण लेन कटिंग करणार्या वाहनचालकांवरही कारवाई करण्यात आली. यामध्ये अवजड वाहनांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. ई-चलनद्वारे ही कारवाई करण्यात आली आहे. द्रुतगती महामार्गवर कळंबोली ते खालापूर टोलनाका दरम्यान ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पळस्पे येथील महामार्ग पोलीस केंद्राचे अधिकार सुभाष पुजारी यांनी दिली. अपर पोलीस महासंचालक विनय कारगावकर व मुख्यालयातील पोलीस अधीक्षक विजय पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान यांच्या मार्गदर्शानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.