Breaking News

विरोधकांना शल्य आणि धसका; काँग्रेसच्या आरोपांवर भाजपचा पलटवार

मुंबई : प्रतिनिधी

पंधरा वर्षे राज्य करण्याची संधी मिळूनसुद्धा अरबी समुद्रात शिवस्मारक उभारता न आल्याचे शल्य विरोधकांच्या मनात आहेच, पण आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचे मोठ्या प्रमाणात भाजपकडे वळणे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या फारच जिव्हारी लागल्यासारखे दिसते आहे, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आरोपांवर पलटवार केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकात भाजपने भ्रष्टाचार केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आणि काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मंगळवारी

(दि. 24) पत्रकार परिषदेत केला. या आरोपांचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेतला. अभ्यास न करता पत्रकार परिषदा घेणे या पलिकडे कोणताही धंदा सचिन सावंत यांनी केला नाही आणि नवाब मलिक यांना तर शिवस्मारकाचे कधीच अप्रुप नव्हते. त्यामुळे ते पोकळ आरोप करीत आहेत, असे

पाटील म्हणाले.

याबाबत वस्तुस्थिती स्पष्ट करताना पाटील यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: मार्च 2018मध्ये या विषयावर सविस्तर निवेदन राज्याच्या विधानसभेत केले होते. प्रत्यक्ष पुतळा आणि चौथरा याचे गुणोत्तर 60.40 असे असते. त्यानुसार 210 मीटर उंचीच्या पुतळ्यामध्ये 121.2 मीटर व 88.8 मीटर असे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांनी सर्व तांत्रिक बाजू तपासून प्रस्तावित केले. (पान 2 वर..)

प्रारंभी निविदा प्रक्रिया जरी 210 मीटरच्या हिशेबाने पूर्ण करण्यात आली तरी त्यानंतर उंची 212 मीटर करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात चबुतर्‍याची उंची कायम ठेवून पुतळ्याची उंची वाढविण्यात आली. केंद्राकडून सर्व परवानग्या आणण्यापासून ते प्रत्यक्ष काम सुरू करण्यापर्यंत सर्व कामे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात झाली. आपण ही कामे करू शकलो नाही याचे शल्य विरोधकांच्या मनात आज अधिक आहे.

एकही वीट न रचता पैसे दिल्या गेल्याचाही आरोप धादांत खोटा आहे. मूळात दोन ते तीन महिने शिवस्मारकाचे प्राथमिक काम झाले आहे आणि एकही रुपया अजून कंत्राटदाराला देण्यात आलेला नाही. कंत्राट अंतिम करताना मुख्य सचिवांची समिती असते, तर सर्व निर्णय हे सुकाणू समितीत सहमतीने होत असतात. त्यात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सचिवांचासुद्धा समावेश असतो. छत्रपतती शिवाजी महाराजांचा सन्मान आघाडी सरकारला करता आला नाही आणि आता काम होताना दिसत असल्याने त्यांना पोटशूळ उठला आहे, अशी टीका पाटील यांनी केली.

Check Also

‘नैना’साठी शेतकर्‍यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका

आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तिसर्‍या मुंबईच्या अनुषंगाने नैना …

Leave a Reply