अलिबाग : प्रतिनिधी
लॉकडाऊनच्या काळातील खर्च भाडे, वीज बिल आदी खर्च पाहता दुकान बंद ठेवले, तर दुकानदारांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल. त्यामुळे दुकानदारांची समस्या समजवून घेत सोमवार ते शुक्रवार दुपारी 2 वाजेपर्यंत दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी अलिबाग शहरातील किरकोळ व्यापार्यांनी बुधवारी (दि. 7) जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे केली आहे. शासनाने विकेंड लॉकडाऊन जाहीर करीत प्रत्यक्षात मंगळवारपासूनच सर्व दुकाने बंद करण्याची सक्ती सुरू केली आहे. संपूर्ण जिल्हाभरात या निर्णयाविरोधात व्यापारी वर्गात संतापाचे वातावरण पसरले आहे. अनेक ठिकाणी स्थानिक प्रशासनासोबत व्यापार्यांचे खटके उडत आहेत. अलिबाग शहरातील किरकोळ व्यापार्यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी तसेच नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले. त्यानुसार किरकोळ दुकानदारांना दुकानाचे भाडे सुमारे 15 हजार, तर वीज बिल दोन हजार रुपये भरावे लागते. घराचा खर्च, मालक भाडे मागणारच, वीज बिलही भरावे लागते. घर खर्च पाहता दुकान बंद ठेवले, तर दुकानदारावर आत्महत्या करण्याची पाळी येईल. त्यामुळे दुकानदारांची समस्या समजून घ्यावी व सोमवार ते शुक्रवार दुपारी 2 वाजेपर्यंत दुकान उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.