Breaking News

मनामनातला महात्मा

मोदीजींच्या एका हाकेसरशी गांधीजींच्या या देशात ‘स्वच्छता अभियाना’ला प्रत्यक्ष आरंभ झाला. स्वत:च्या हाती झाडू घेणारा पंतप्रधान या देशाने प्रथमच पाहिला. स्वच्छता अभियान, गावे दत्तक घेण्याची योजना यांनी बघता-बघता चळवळीचे रूप धारण केले. गावोगावी उघड्यावर शौच करण्याची भारतीय सवय मोडू लागली. गेल्या पाच वर्षांत अकरा कोटींहून अधिक शौचालये देशभरात बांधून काढण्यात आली.

उजव्या विचारसरणीचा पक्ष सत्तेवर आला की लोकशाहीला पोषक वाटणारा समाजवाद बाजूला पडतो असा एक अकारण समज गेली सत्तरहून अधिक वर्षे आपल्या देशात पद्धतशीरपणे जोपासला गेला. किंबहुना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पर्यायाने भारतीय जनता पक्ष हे गांधीद्वेष्टे असल्याचे चित्र निर्माण केले गेले. हा अर्थात काँग्रेसने पसरवलेला व्यापक भ्रम होता आणि काँग्रेसच्या या प्रयत्नांना बर्‍यापैकी यश देखील मिळाले. तथापि, अवघ्या जगाला अहिंसेचे तत्त्वज्ञान देणारे महात्मा गांधी आज देखील कालबाह्य झालेले नाहीत हे या भारत देशाला पटवून देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर यावे लागले यातच सारे काही आले. स्वातंत्र्योत्तर काळात ‘गांधी’ या नावाचा वापर सत्ताधार्‍यांनी केवळ आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी केला. गांधीजींचे पुतळे उभारणे, रस्ते आणि चौकांना त्यांचे नाव देणे म्हणजे गांधीवाद नव्हे हे खडसावून सांगितले ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच. निव्वळ नामस्मरण आणि राजकीय ढोंगबाजी यात काँग्रेसने एका महात्म्याचे नाव बेदरकारपणे वापरून घेतले. महात्मा गांधी ही जणु काही निव्वळ काँग्रेस पक्षाचीच खाजगी मालमत्ता असल्यासारखा सारा कारभार गेल्या सात दशकांहून अधिक काळ सुरू होता. परंतु खरे सांगायचे तर, या काळात गांधीजींची सर्वाधिक अवहेलना कुणाकडून झाली असेल तर ती काँग्रेसकडूनच. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस पक्षाचा हेतू साध्य झाल्याने हा पक्ष आता विसर्जित करावा असे खरे तर गांधीजींनी सुचवले होते. त्याच पक्षाने गांधीजींच्या पश्चात अनेक वर्षे सुखेनैव सत्ता भोगली. गांधी पुण्यतिथी आणि गांधी जयंती या दिवशी ‘ड्राय डे’ जाहीर करण्यापलीकडे काँग्रेसने काहीही केले नाही. रस्ते आणि चौकांना गांधीजींचे नाव देऊन स्वस्थ बसणार्‍या काँग्रेसी बांधवांना गांधीजी म्हणजे नेमके काय हे मोदीजींनी दाखवून दिले. 2014 साली सत्तेवर येण्यापूर्वी गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदीजींनी गांधीजींच्या साबरमती नदीचा कायापालट करून दाखवला. याच नदीच्या काठावरचा पवित्र गांधी आश्रम आज देखील जगातील गांधीभक्तांचे तीर्थस्थळ आहे. परंतु हे काम उठता-बसता गांधीनामाचा जप करणार्‍या काँग्रेसने केले नाही तर संघाच्या मुशीत घडलेल्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्षात आणले. ‘स्वच्छ भारत’ हे तर गांधीजींचेच स्वप्न होते. सरकारी भिंतींवरील फोटोफ्रेममध्ये बंदिस्त राहिलेले गांधीजी नव्या भारताच्या निर्माणात सहभागी होतानाची सुखद जाणीव त्यांच्या दीडशेव्या जयंतीच्या निमित्ताने होते आहे. गांधीजींच्या स्वप्नातला भारत साकार करण्याचे प्रयास असेच पुढे सुरू ठेवावे लागतील. त्या हेतूनेच भारतीय जनता पक्षाने ‘गांधी संकल्प यात्रा’ कार्यक्रम हाती घेतला असून त्याअंतर्गत गांधीजींच्या विचारसरणीचा प्रचार-प्रसार येत्या 31 जानेवारीपर्यंत केला जाणार आहे. पुढची दीडशे वर्षेही प्रत्येक भारतीयाच्या मनात गांधीजी असावेत यासाठीच हे प्रयत्न आहेत.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply