पेण : प्रतिनिधी
आगरी समाज बांधवांनी स्वतःची उन्नती साधताना आपल्या समाजाचेही हित जोपासावे, असे प्रतिपादन आमदार रविशेठ पाटील यांनी पेण येथे केले.
पेण तालुका आगरी समाज विकास मंचच्या वतीने पेणमधील आगरी समाज हॉलमध्ये समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. आगरी समाज विकास मंचाचे अध्यक्ष धर्माजीशेठ म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात आमदार पाटील प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. एकमेकांना साथ द्या, असे आवाहन त्यांनी या वेळी समाज बांधवांना केले.
पारंपरिक शेती, मत्स्यव्यवसाय सांभाळत समाजातील मुले विविध क्षेत्रांत भरारी घेत आहेत. त्यामुळे समाज उन्नतीकडे वाटचाल करीत आहे. जेव्हा आपली प्रगती होते तेव्हा समाजातील दुबळ्या लोकांची मदत करणे आपले कर्तव्य आहे, असेही आमदार रविशेठ पाटील यांनी सांगितले.
जेव्हा आपल्या समाजाच्या वतीने सत्कार होतो, तेव्हा एक जबाबदारी वाढली, असे विद्यार्थ्यांनी समजावे. विशेषतः दहावीनंतर विद्यार्थी आपल्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात, परंतु याचवेळी खर्या अर्थाने अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे, असे सांगून नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी एक ध्येय बाळगून काम केले तरच यश प्राप्त होईल, असे मत व्यक्त केले.
या वेळी आगरी समाजातील वैमानिक महेश जयराम पाटील व डॉ. सुविधा लिलाधर पाटील यांचा रविशेठ पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच शैक्षणिक प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नगर परिषदेचे बांधकाम सभापती राजेश म्हात्रे, येथील सार्वजनिक हायस्कूलचे अध्यक्ष पी. डी. पाटील, मंचाचे उपाध्यक्ष गोवर्धन पाटील, उज्ज्वल म्हात्रे, कार्यवाह एन. आर. पाटील, सरचिटणीस ह. बा. पाटील, न. का. पाटील, गणेश ठाकूर आदींसह आगरी समाज बांधव या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रा. वि. ठाकूर यांनी आभार मानले.