नवीन पनवेल ः रामप्रहर वृत्त
ब्राह्मण सभा, नवीन पनवेल यांच्या वतीने भोंडला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नवीन पनवेल येथील आंध्र कला केंद्राच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात पनवेल परिसरातील महिला व मुलींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. हादग्याची गाणी गात फेर घरून नृत्य करून महिलांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला.
सूर्याचा हस्त नक्षत्रात प्रवेश झाला की जो पाऊस पडतो, तो शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असतो. याचा आनंद हादग्याची गाणी गाऊन व फेर धरून नृत्य करून साजरा केला जातो. त्याला भोंडला या नावाने संबोधले जाते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुजाता कुलकर्णी, मुग्धा भागवत, दीपाली जोशी, सानिका केळकर, मुग्धा अंबेकर, वरदा जोशी, डॉ. अंजली टकले यांनी मोलाचे योगदान दिले. माधव भागवत याने गाण्यांना उत्कृष्ट तबलासाथ केली.
सध्या पाश्चात्य संस्कृतीच्या आक्रमणामध्ये आपली संस्कृती टिकून राहण्यासाठी, तसेच मुलांवर निसर्गपूजनाचे व रक्षणाचे संस्कार व्हावे यासाठी नवीन पनवेल ब्राह्मण सभेच्या वतीनेे हा उपक्रम प्रतिवर्षी ठिकठिकाणी आयोजित केला जाणार आहे.
-मुग्धा भागवत