Breaking News

अलिबागमध्ये काँग्रेसकडून दोन उमेदवार

राजेंद्र ठाकूरांपाठोपाठ अ‍ॅड. श्रद्धा ठाकूर यांचा अर्ज

अलिबाग : प्रतिनिधी

अलिबाग विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाकडून उमेवारी मिळवण्यावरून ठाकूर कुटुंबात सुरू असलेले वाद चव्हाट्यावर आले आहेत. काँग्रेसने अधिकृत उमेदवार म्हणून रायगड जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा अ‍ॅड. श्रध्दा ठाकूर यांना उमेदवारी दिली.  शुक्रवारी (दि. 4) त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी गुरुवारी (दि. 3) श्रध्दा ठाकूर यांचे दीर राजेंद्र ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. रायगड जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप अशी आघाडी आहे. या आघाडीतर्फे काँग्रेसला महाड विधानसभा मतदारसंघ देण्यात आला आहे. तरीदेखील पेण, उरण व अलिबाग येथे शेकाप व काँग्रेस यांच्यात मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत. काँग्रेसने उरण व पेण येथील आपले उमेदवार जाहीर केले, मात्र अलिबामधील उमेदवार जाहीर केला नव्हता. माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे ज्येष्ठ पुत्र अ‍ॅड. प्रवीण ठाकूर, दुसरे पुत्र राजेंद्र ठाकूर व तिसरे पुत्र अ‍ॅड. महेश ठाकूर यांची पत्नी अ‍ॅड. श्रध्दा ठाकूर यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. त्यापैकी राजेंद्र ठाकूर यांनी आपला प्रचार निवडणुकीची तारीख जाहीर होण्याआधीच सुरू केला होता. काँगे्रस पक्ष आपल्यालाच उमेदवारी देणार अशी त्यांना खात्री होती, परंतु काँग्रेसने रायगड जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अ‍ॅड. श्रध्दा ठाकूर यांना उमेदवारी दिली. आपल्या घरातील वाद बाहेर जाऊ नयेत, ते घरातच मिटवावे म्हणून या दोघांना समजावण्याचे प्रयत्न माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी केले, परंतु ते अयशस्वी झाले. काँगे्रसने अधिकृत उमेवारी दिलेली नसताना 3 ऑक्टोबर रोजी राजेंद्र ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असा उल्लेख त्यांनी केला आहे, परंतु शुक्रवारी सकाळी  काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार म्हणून अ‍ॅड. श्रध्दा ठाकूर यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राजेंद्र ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा काँग्रेसचे अलिबाग तालुक्यातील दुसर्‍या फळीतील नेते त्यांच्या समवेत  होते, परंतु अ‍ॅड. श्रध्दा ठाकूर यांचा उमेदवारी अर्ज भरताना काँग्रेसचा एकही नेता त्यांच्यासोबत हजर नव्हता. महिला काँग्रेसच्या काही पदाधिकार्‍यांसमवेत अ‍ॅड. श्रध्दा ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राजेंद्र ठाकूर यांनी माणसे जमवली, परंतु त्यांना काँगे्रसकडून तिकीट मात्र मिळाले नाही. काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यात ठाकूर कुटुंबात चुरस होती. त्यात अ‍ॅड. श्रध्दा ठाकूर यांनी बाजी मारली. असे असले तरी या उमेदवारीवरून ठाकूर कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कोण जिंकणार यापेक्षा ठाकूर कुटुंबातील हा वाद भविष्यात कोणते वळण घेणार याबाबतच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply