पनवेल ः रामप्रहर वृत्त
नवतरुण नवरात्र उत्सव मंडळ भेंडखळ आणि डॉ. आर.एन. पाटील, सुरज हॉस्पिटल, सानपडा यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार (दि. 2) म्हातार आळी, भेंडखळ येथे मोफत आरोग्य शिबिर झाले.
श्री. नवतरुण नवरात्र उत्सव मंडळाचे कार्यक्षम व समाजकार्याची आवड असलेले सदस्य अनिल ठाकूर यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. सकाळी ठीक 10 वाजता या शिबिराचे उद्घाटन नवघर जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण ठाकूर, नवतरुण नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष भारत ठाकूर, उपाध्यक्ष दयाघन ठाकूर, अनिल ठाकूर आणि सर्व सदस्य उपस्थित होते. डॉ. आर. एन. पाटील, सुरज हॉस्पिटल, सानपडा येथील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम म्हस्के आणि त्यांची संपूर्ण वैद्यकीय टीमने उपस्थित ग्रामस्थांची मोफत वैद्यकीय तपासणी केली. या शिबिरात मेंदूचे आजार, मणक्याचा आजार, मानसिक विकार, हृदयविकार, कर्णविकार इत्यादी आजारांची तपासणी करून त्यावर उपचार व मोफत औषधेवाटप केले. भेंडखळ गावातील सुमारे 150 नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.